Air India flight crash in Ahmedabad : अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत पायलटचा दोष होता असा अहवाल भारताकडून तयार केला जात असल्याचा धक्कादायक दावा इटालियन वृत्तपत्र करीएर डेला सेरा यात प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचे पडसाद भारतातही उमटले. अखेर या वृत्तावर एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) उत्तर दिलंय. या वृत्तात केलेल दावे एएआयबीने फेटाळून लावले आहेत. इटालियन वृत्तपत्राने दिलेले वृत्त चुकीचं आणि काल्पनिक असल्याचं एएआयबीने म्हटलंय. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

इटालियन दैनिक कोरीएर डेला सेरा यांनी सूत्रांचा हवाला देत म्हटलं होतं की हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे न होता पायलटने जाणीवपूर्वक इंधनपुरवठा बंद कल्याने झाला होता. याबाबत भारतातील तपास यंत्रणा अंतिम अहवाल तयार करत आहेत.” परंतु, या प्रकरणी अद्याप कोणताही निष्कर्ष काढला नसून चौकशी सुरू असल्याचं एएआयबीने सांगितलं. एएआयबीने म्हटले आहे की ते विमान (अपघात आणि घटनांचा तपास) नियम, २०२५ आणि आयसीएओ परिशिष्ट १३ अंतर्गत भारताच्या दायित्वांनुसार काटेकोरपणे चौकशी करत आहे, जे विमान अपघात तपासासाठी आंतरराष्ट्रीय मानकांचे नियमन करते. अशा तपासण्या तांत्रिक आणि पुराव्यावर आधारित असतात यावर भर देऊन, ब्युरोने म्हटले आहे की त्यांचा उद्देश मूळ कारणे निश्चित करणे आणि विमान वाहतूक सुरक्षा वाढवणे आहे.

एएआयबीने नमूद केले की आधी प्रसिद्ध झालेल्या प्राथमिक अहवालात चौकशीच्या त्या टप्प्यावर उपलब्ध असलेली तथ्यात्मक माहिती होती. अंतिम तपास अहवाल, ज्यामध्ये निष्कर्ष आणि सुरक्षा शिफारसींचा समावेश असेल, तो तपास पूर्ण झाल्यानंतर स्थापित आंतरराष्ट्रीय नियमांनुसार प्रकाशित केला जाईल. तसंच, एएआयबीने माध्यमांनाही यावेळी झापलं आहे. या प्रकरणात संयम बाळगून कोणतेही अनुमान टाळण्याचे आाहनही त्यांनी केले आहे.

इटालियन वृत्तात काय म्हटलं आहे?

“भारतीय तपास यंत्रणांनी असे निश्चित केले आहे की १२ जून २०२५ रोजी इंजिनमध्ये इंधन पुरवठा बंद झाल्यानंतर झालेला अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला नव्हता तर जाणीवपूर्वक केलेल्या कृतीमुळे झाला होता आणि अधिकारी आता त्यांचा अंतिम अहवाल तयार करण्याची तयारी करत आहेत. या तपासात अमेरिकन तज्ज्ञही मदत करत आहेत”, असं वृत्तपत्राने वृत्तात म्हटलं आहे.