देशातील ३५ जिल्ह्यांना केंद्राच्या सूचना; महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांचा समावेश

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील एकूण ३५ जिल्ह्य़ांमध्ये करोना रुग्ण आणि मृत्यूदर अधिक असल्याने कडक प्रतिबंधात्मक उपाय करण्याबरोबरच चाचण्या वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. सर्वाधिक रुग्णवाढीच्या ३५ जिल्ह्य़ांमध्ये महाराष्ट्रातील १७ जिल्ह्य़ांचा समावेश आहे.

रुग्णवाढ आणि मृत्यूदर अधिक असलेल्या ३५ जिल्ह्य़ांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहमदनगर, रायगड, जळगाव, सोलापूर, सातारा, पालघर, औरंगाबाद, धुळे आणि नांदेडचा समावेश आहे.

देशाच्या ३५ जिल्ह्य़ांतील करोना परिस्थितीचा आढावा नुकताच घेण्यात आला. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाय करण्याबरोबरच बाधितांचा शोध घेताना अन्य आजार असलेले रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना संबंधित राज्यांना देण्यात आल्या. तसेच पहिल्या टप्प्यातील रुग्णनिदान करण्यासाठी आणि संसर्ग साखळी तोडण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आणि ‘आरटी-पीसीआर’ चाचण्या करण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले.

संबंधित ३५ जिल्ह्य़ांचे जिल्हाधिकारी आणि अन्य यंत्रणांनी करोना साथ नियंत्रणाच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या योजना आखाव्यात किंवा असलेल्या योजना अद्यावत कराव्यात, असे निर्देशही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी ‘दूरचित्रसंवाद’ माध्यमातून महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात,  झारखंड आणि पाँडेचेरीच्या आरोग्य सचिवांशी संवाद साधला आणि त्यांना करोना नियंत्रणाचे व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सूचना केल्या. या बैठकीत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि अन्य यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते.

राज्यांच्या आरोग्य सचिवांनी संबंधित करोनाबाधित जिल्ह्य़ांतील सध्याच्या करोना परिस्थितीचा तपशीलवार अहवालही या बैठकीत सादर केला. या अहवालात प्रतिबंधात्मक उपाय, रुग्णसंपर्क शोध, संशयित रुग्णांवर लक्ष, मृत्यूचे प्रमाण, साप्ताहिक रुग्णवाढ, आरटी-पीसीआर चाचणी, जलद प्रतिजन चाचण्या, रुग्णांलयातील खाटांची स्थिती, अतिदक्षता विभागातील खाटांची सद्य: स्थिती, तेथील आरोग्य सुविधा, कृत्रिम श्वसन यंत्रणा इत्यादी माहितीचा समावेश होता. तसेच पुढील एक महिन्याची करोना नियंत्रणाची कृती योजनाही संबंधित राज्यांनी सादर केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली.

केंद्राच्या सूचना

पहिल्या टप्प्यात रुग्णनिदान करण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवा

– संसर्ग साखळी तोडण्यासाठी ‘आरटी-पीसीआर’ चाचणीचा उपयोग करा

– तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि अन्य आजार असलेल्या करोना रुग्णांना त्वरित रुग्णालयात दाखल करा.

– गृहविलगीकरणावर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक

– करोनाची गंभीर लक्षणे दिसताच रुग्णाला त्वरित रुग्णालयात दाखल करा

– संसर्ग प्रतिबंधांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनीही आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात

राज्यातील करोनाग्रस्त जिल्हे

मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहमदनगर, रायगड, जळगाव, सोलापूर, सातारा, पालघर, औरंगाबाद, धुळे आणि नांदेड.

देशात सर्वाधिक रुग्णवाढ कुठे?

दिल्लीतील ११, पश्चिम बंगालमधील कोलकाता, हावडा, उत्तर २४ परगणा आणि २४ दक्षिण परगणा, गुजरातमधील सूरत, झारखंडमधील पूर्व सिंहभूम आदी जिल्ह्य़ांमध्ये सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूदर नोंदवण्यात येत आहे.

२४ तासांत ९० हजारांहून अधिक बाधित

देशात एका दिवसात ९० हजारांहून अधिक करोना रुग्ण आढळल्याने बाधितांच्या एकूण संख्येने रविवारी ४१ लाखांचा टप्पा ओलांडला. देशात रविवारी ९० हजार ६३२ जणांना संसर्ग झाल्याने करोना रुग्णांची एकूण संख्या ४१ लाख १३ हजार ८११ झाली आहे,तर गेल्या २४ तासांत एक हजार ६५ रुग्ण दगावल्याने बळींचा आकडा ७० हजार ६२६वर पोहोचला आहे.

बरे होण्याचे प्रमाण ७७.३२ टक्क्य़ांवर

’देशात २४ तासांत ७३ हजार ६४२ रुग्ण बरे झाल्याने करोनामुक्तांचे प्रमाण ७७.३२ वर पोहोचले आहे, तर मृत्यूचा दर १.७२ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

’देशात आतापर्यंत ३२ लाख रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. देशात आठ लाख ६२ हजार ३२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

’हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या २०.९६ टक्के आहे. सलग दोन दिवस बरे होणाऱ्यांची संख्या ७० हजारांहून अधिक नोंदवण्यात येत आहे.