पीटीआय, नवी दिल्ली : येत्या रविवारपासून (१० एप्रिल) १८ वर्षांवरील सर्वाना करोनाची वर्धक मात्रा (बूस्टर डोस) सशुल्क देण्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी केली. करोनाची दुसरी मात्रा घेतल्यानंतर ९ महिने पूर्ण झालेले १८ वर्षांवरील सर्व नागरिक सशुल्क वर्धक मात्रेसाठी पात्र आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. १८ वर्षांवरील सर्वाना खासगी लसीकरण केंद्रांवर वर्धक मात्रा सशुल्क उपलब्ध करण्यात येईल, असेही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ‘सीरम’निर्मित कोव्हिशिल्डच्या एका वर्धक मात्रेसाठी ६०० रुपये मोजावे लागणार आहेत.

वर्धक मात्रेमुळे करोनापासून एक अतिरिक्त संरक्षण मिळेल. दोन्ही मात्रा घेतलेल्या १८ वर्षांवरील पात्र नागरिकांना १० एप्रिलपासून सर्व खासगी लसीकरण केंद्रांवर वर्धक मात्रा देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे ट्वीट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी केले. आतापर्यंत १५ वर्षांवरील सर्व लोकांपैकी सुमारे ९६ टक्क्यांनी करोना लशीची एक मात्रा घेतली आहे, तर सुमारे ८३ टक्के लोकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. आरोग्य कर्मचारी, आघाडीवरील कामगार-कर्मचारी आणि ६० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना दोन कोटी ४० लाख वर्धक मात्रा देण्यात आल्या आहेत. याशिवाय, १२ ते १४ वयोगटातील ४५ टक्के लाभार्थीनाही पहिली मात्रा देण्यात आली असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

कुठे मिळेल ? सर्व खासगी लसीकरण केंद्रांवर

केव्हापासून मिळेल?  रविवार, १० एप्रिलपासून

पात्र कोण?  करोना लशीच्या दोन मात्रा घेऊन ९० दिवस झालेले.

कोव्हिशिल्डच्या वर्धक मात्रेसाठी ६०० रुपये

नवी दिल्ली : ‘सीरम’निर्मित कोव्हिशिल्डच्या एका वर्धक मात्रेसाठी ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. ‘सीरम’नेच शुक्रवारी याबाबतची घोषणा केली. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी वर्धक मात्रा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना, ‘‘ही मात्रा घेतल्यामुळे करोना विषाणूपासून दीर्घकाळ संरक्षण मिळेल’’, असे सांगितले. लसलाभार्थीना प्रत्येक वर्धक मात्रेसाठी ६०० रुपये शुल्क भरावे लागेल, तथापि, रुग्णालयांना मात्र ही मात्रा सवलतीच्या दरात देण्यात येईल, असेही पूनावाला यांनी स्पष्ट केले.

रुग्णसंख्या कमी करण्याचे राज्यांना पत्र : महाराष्ट्रासह दिल्ली, हरयाणा, केरळ, मिझोराम आदी राज्यांना करोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्राने पत्र पाठविले. गेल्या आठवडय़ात या राज्यांमधील रुग्णसंख्या किंचित वाढत असल्याचे लक्षात आले.