पाकिस्ताने काल टी-२० विश्वचषकामध्ये भारताचा दहा विकेटने पराभव केला. आतापर्यंत नेहमीच भारता विरुद्ध पाकिस्तानला पराभवला सामोरं जाव लागत होतं. मात्र कालच्या सामान्यात बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघाने भारतीय संघाचा दारूण पराभव केल्याने, पाकिस्तानमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. शिवाय, पाकिस्तानी मंत्र्यांकडून आता विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी तर प्रतिक्रिया देताना खळबळजनक विधान केलं आहे. आपली फायनल आजच होती. जगभरातील मुस्लिमांसह भारतीय मुस्लिमांच्या भावना पाकिस्तानी संघासोबत होत्या. असं त्यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानी गृहमंत्री रशीद यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते म्हणातात, “मी पाकिस्तानी जनतेला विजयाबद्दल शुभेच्छा देतो. ज्याप्रकारे संघाने विजय मिळवला आहे, त्याला मी सलाम करतो. आज पाकिस्तानने आपली ताकद दाखवली आहे. मला वाईट याचं वाटतं की हा पहिला भारत-पाकिस्तान सामना आहे, जो मी जनतेच्या काही जबाबदाऱ्यांमुळे प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहू नाही शकलो. परंतु मी यंत्रणेला सांगितले आहे की जनतेला जल्लोष साजरा करू द्या. पाकिस्तानी संघाला व जनतेला शुभेच्छा. आजच आपली फाइनल होती. जगभरासह भारतातील मुस्लिमांच्या भावना पाकिस्तानी संघासोबत होत्या. समस्त इस्लामला विजयाबद्दल शुभेच्छा.”

पाकिस्तानचे गृहमंत्री रशीद भारत आणि पाकिस्तानची मॅच पाहण्यासाठी यूएईला पोहचले होते. मात्र, सद्य परिस्थिती पाहता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांना परत बोलावले होते. पाकिस्तानमधील सद्यपरिस्थिती हाताळण्यासाठी रशीद यांनी परत बोलावण्यात आले असल्याची माहिती समोर आली आह. कारण, पाकिस्तानमध्ये कट्टरपंथी समूह तहरीर ए लब्बैक पाकिस्तान(टीएलपी)ने घोषणा केली होती की, ते आपले प्रमुख हाफिज हुसैन रिझवीच्या नजरकैदेच्या विरोधात इस्लामाबादमध्ये एक मोठा मोर्चा काढतील. यामुळेच शेख रशीद यांना परत बोलावले गेले असल्याची माहिती समोर आली आहे.