Indigo Flights Delayed Across India: गेल्या काही दिवसांपासून Indigo कंपनीची विमाने मोठ्या प्रमाणावर रद्द होण्याचं आणि जी उड्डाणे घेत आहेत, त्यांना प्रचंड विलंब होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. देशातल्या अनेक विमानतळांवर इंडिगोच्या प्रवाशांची मोठी गर्दी दिसत असून अचानक विमान उड्डाण रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक प्रवाशांनी यासंदर्भात आपला संताप माध्यमांसमोर व्यक्त केला असतानाच आता इंडिगोकडून याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. प्रवाशांना होणारा हा मनस्ताप इतक्यात संपणारा नाही, असंच कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीमधून समोर येत आहे.

गुरुवारी डीजीसीए अर्थात Directorate General of Civil Aviation च्या महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये इंडिगोचे अनेक वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. कंपनीच्या विस्कळीत झालेल्या विमान सेवेचा आढावा यावेळी घेण्यात आला. या बैठकीमध्ये प्रवासी सेवा पूर्ववत कधीपर्यंत होऊ शकेल? या मुद्द्यावरही चर्चा झाली. त्यावर इंडिगोकडून आणखी २ ते ३ दिवस अशाच प्रकारे विमाने रद्द होतील, अशी माहिती दिल्याचं फायनान्शियल एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

Indigo चं नेमकं म्हणणं काय?

इंडिगोची सेवा खात्रीशीर आणि वक्तशीरपणासाठी लोकप्रिय आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशभरात प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबद्दल इंडिगोकडून खंत व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, नेमका हा सगळा गोंधळ का होत आहे, याबाबतही इंडिगोनं डीजीसीएच्या बैठकीमध्ये सविस्तर माहिती दिली.

कर्मचाऱ्यांची कमतरता, ग्राऊंड स्टाफच्या नियुक्त्यांमध्ये येणारी आव्हानं, वेळापत्रक लावताना निर्माण होणारा ताण यामुळे विमानांची उड्डाणं रद्द करावी लागत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. “स्लॉट्स फक्त रात्रीच्या वेळी उपलब्ध असल्यामुळे व्यवस्थापनात आणखी अडचणी येत आहेत येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी विमाने रद्द होतील”, असं इंडिगोनं डीजीसीएला सांगितलं आहे.

सुधारणेसाठी Indigo नेमकं काय करतंय?

दरम्यान, कंपनीकडून सदर परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी पावलं उचलण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, असं असलं, तरी इंडिगोची विमानसेवा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी १० फेब्रुवारी २०२६ पर्यंतची मुदत कंपनीनं डीजीसीएकडे मागितली आहे. तसेच, ८ डिसेंबरपासून एकूण विमान उड्डाणांची संख्याच मर्यादित करण्याचाही विचार कंपनी करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

एकीकडे विमानांची उड्डाणं कमी करतानाच दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या वेगाने वाढवण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न चालू आहेत, असंही इंडिगोनं डीजीसीएला कळवलं आहे.