नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सैन्य दले आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या सैनिक आणि अधिकार्‍यांना ७८ शौर्य पुरस्कार मंजूर केले, यापैकी १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कारांमध्ये नऊ किर्ती चक्रे, १९ शौर्य चक्रे, एक बार टू शौर्य चक्र, पाच बार टू सेना पदके आणि ३६ सेना पदके, तीन नौसेना पदके, पाच वायूसेना पदके यांचा समावेश आहे. किर्ती चक्र हा शांतता काळातील कामगिरीसाठी दिला जाणारा अशोक चक्रानंतर दुसर्‍या क्रमांकाचा, तर शौर्य चक्र हा तिसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार आहे.

३६ राष्ट्रीय रायफल्सचे मेजर परमवीर, ५७ राष्ट्रीय रायफल्सचे मेजर तरुण वासुदेवन, १२ डोगरा रेजिमेंटचे मेजर केशव कुमार, २१ ग्रेनेडियर्सचे मेजर गौरव सिंग ब्रिजवाल, ११ राष्ट्रीय रायफल्सचे मेजर विपीन कुमार, ३ आसाम रायफल्सचे नायब सुभेदार शंकर राम आणि २१ पॅराचे (स्पेशल फोर्स) नायब सुभेदार डब्बल सिंग बिश्त, ४ पॅराचे (स्पेशल फोर्सेस) हवालदार जगत्तर सिंग, ९ राष्ट्रीय रायफल्सचे लान्स नाईक नरेंद्र सिंधू (मरणोत्तर), ११ राष्ट्रीय रायफल्सचे लान्स नाईक कपिल देव, ७ शीख लाइट इन्फंट्रीचे शिपाई जसविंदर सिंग, नौदलाचे लेफ्टनंट कमांडर शिवम कुमार, हवाई दलाचे स्क्वाड्रन लीडर सुधीर कुमार, डेप्युटी सुपरिटेन्डंट धीरज सिंग कटोच, इन्स्पेक्टर अजय सिंग चिब, डेप्युटी सुपरिटेन्डंट सुखवीर सिंग, असिस्टंट इन्स्पेक्टर नियाज अहमद, डेप्युटी कमांडंट अंजनी कुमार आणि कॉन्स्टेबल दीपक साह हे शौर्य चक्र पुरस्काराचे मानकरी आहेत. ४४ आसाम रायफल्सचे मेजर आदित्य प्रताप सिंह यांना दुसर्‍यांदा शौर्य चक्र पुरस्काराने गौरवण्यात येत आहे.

नऊ जणांना किर्ती चक्र

२१ पॅराचे (स्पेशल फोर्सेस) लेफ्टनंट जनरल मनोज फ्रान्सिस आणि २ पॅराचे (स्पेशल फोर्सेस) मेजर जितेंद्र राठी यांना शौर्य पुरस्कार जाहीर झाला. सात जणांना मरणोत्तर किर्ती चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये हवालदार गजेंद्र सिंग (२ पॅरा – स्पेशल फोर्सेस), जगबीर सिंग (हेड कॉन्स्टेबल), जसवंत सिंग (कॉन्स्टेबल), बलविंदर सिंग (कॉन्स्टेबल), तारिक हुसेन (कॉन्स्टेबल), बशीर अहमद (हेड कॉन्स्टेबल) आणि सुनील कुमार (इन्स्पेक्टर) यांचा समावेश आहे.