भ्रष्ट देशांच्या यादीत भारत ८३ वा

टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा खाणवाटप गैरव्यवहार, आदर्श घोटाळा.. गेल्या काही वर्षांत भारतामध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत.

टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा खाणवाटप गैरव्यवहार, आदर्श घोटाळा.. गेल्या काही वर्षांत भारतामध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. मात्र तरीही जगभरातील भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत ८३वा आहे. कारण सोमालिया, उत्तर कोरिया, अफगाणिस्तान, रशिया हे देश भारतापेक्षा अधिक भ्रष्टाचारी आहेत, तर डेन्मार्क, न्यूझीलंड या देशांची स्वच्छ प्रतिमा असल्याचे एका सव्‍‌र्हेक्षणातून दिसून आले आहे.
‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने जगभरातील स्वच्छ प्रतिमा असलेल्या १७७ देशांची यादी तयार केली आहे. या यादीत चीन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिल या देशांची प्रतिमा भारतापेक्षा जरा चांगली आहे. मात्र या यादीत रशिया १२७वा आहे. त्यामुळे या बलाढय़ देशात आपल्यापेक्षा अधिक भ्रष्टाचार होत असल्याचे या यादीतून दिसून येत आहे. या यादीत भारत ९४वा आहे. म्हणजेच भ्रष्टाचारी देशांमध्ये भारत ८३वा असल्याचे ही यादी सांगते.
ही यादी तयार करताना या संस्थेने ० ते १०० यांमधील गुण प्रत्येक देशाला दिले. म्हणजेच ० गुण असलेला देश सर्वाधिक भ्रष्टाचारी, तर १०० गुण असलेला देश सर्वाधिक स्वच्छ प्रतिमा असलेला. कोणत्याही देशाला यांमध्ये १०० गुण मिळाले नाहीत. मात्र डेन्मार्क व न्यूझीलंड या देशांनी ९१ गुण मिळवून अव्वल स्थान मिळवले. भारताला या यादीत केवळ ३६ गुण मिळाले.  भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश या देशांमध्ये भारतापेक्षाही अधिक भ्रष्टाचार चालतो हेही या यादीतून दिसून आले आहे.

सर्वाधिक भ्रष्टाचारी देश
सोमालिया, उत्तर कोरिया, अफगाणिस्तान, सुदान, लिबिया, इराक, उझबेकिस्तान, सीरिया, हैती, व्हेनेझुला, झिम्बाब्वे, म्यानमार.

सर्वाधिक स्वच्छ देश
डेन्मार्क, न्यूझीलंड, फिनलंड, स्वीडन, नॉर्वे, सिंगापूर, स्वीत्र्झलड, हॉलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India 83rd among 177 nations on corruption list