पात्र लोकांना लसीचा पहिला डोस देणारं हिमाचल प्रदेश हे पहिलं राज्य: पंतप्रधान मोदी

हिमाचल प्रदेश हे सर्व पात्र लोकांना करोना लसीचा पहिला डोस देणारे पहिले राज्य बनले आहे. सिक्कीम, दादरा आणि नगर हवेलीने देखील हे लक्ष्य पूर्ण केलंय, असेही मोदींनी सांगितले.

देशात राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत भारतात दररोज १.२५ कोटी लशी राज्यांना पुरवल्या जात आहेत. लशींची संख्या ही अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी म्हणाले. तसेच हिमाचल प्रदेश हे सर्व पात्र लोकांना करोना लसीचा पहिला डोस देणारे पहिले राज्य बनले आहे. सिक्कीम, दादरा आणि नगर हवेलीने देखील हे लक्ष्य पूर्ण केलंय, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पंतप्रधाने मोदींनी राज्यातील आरोग्य कर्मचारी आणि राज्यातील करोना लसीकरण कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. पायाला फ्रॅक्चर असूनही लोकांचे लसीकरण केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी उना येथील आरोग्य कर्मचारी कर्मो देवी यांचे कौतुक केले. देवी यांनी आतापर्यंत २२ हजार ५०० लोकांचं लसीकरण केलंय. दरम्यान, लाहौल-स्पीती येथील नवांग उपशाक यांनी मोदींना सांगितले की, अटल बोगद्याने आदिवासी जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला चालना दिली आहे.

“मी हिमाचल प्रदेशला मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करताना पाहिले आहे. पण आज ते खूप चांगलं काम करत आहेत. सरकार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन. डोंगराळ राज्य असल्याने हिमाचलला वाहतूक आणि साठवणुकीमध्ये अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. परंतु राज्य सरकारने हे काम प्रशंसनीय पद्धतीने हाताळले,” असे म्हणत त्यांनी हिमाचल प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे कौतुक केले.

दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत २५ लाख २३ हजार ८९ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ६८.७५ कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India administering 1 25 crore covid vaccines daily says pm modi hrc

ताज्या बातम्या