Indian Embassy issues fresh India advisory for nationals in Israel to ensure citizen safety during the conflict : मध्य पूर्वेतील बिघडत चाललेली सुरक्षा परिस्थिती पाहता, तेल अवीव येथील भारतीय दूतावासाने इस्रायलमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना ‘अत्यंत सावधगिरी’ बाळगण्याचा इशारा दिला आहे. इराणवरील इस्रायली हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावामुळे हे पाऊल उचलण्यात आले असून, भारतीयांना स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढत असतानाच इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये हल्ला केलाय. इराणची राजधानी तेहरानमध्ये शनिवारी मोठा स्फोट झाला. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ हा हल्ला झाला असून यावेळी ८६ वर्षीय खामेनी यावेळी कार्यालयात होते की नाही याबाबत स्पष्टता झालेली नाही. दरम्यान, या दोन्ही देशांत तणाव वाढत असताना इस्रायलमधील भारतीय राजदूतांनी भारतीयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

भारतीय दूतावासाने काय म्हटलंय?

“प्रदेशातील सद्य सुरक्षा परिस्थिती पाहता, इस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि सदैव सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. भारतीय नागरिकांना इस्रायली अधिकारी आणि ‘होम फ्रंट कमांड’द्वारे जारी केलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.अद्ययावत सूचना या संकेतस्थळावर पाहता येतील: https://www.oref.org.il/eng”, असं भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.

“सर्व भारतीय नागरिकांनी नियुक्त केलेल्या आश्रयस्थानांच्या (shelters) जवळ राहावे आणि आपल्या निवासस्थानी किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या जवळच्या सुरक्षित जागांची माहिती करून घ्यावी. भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत इस्रायलमध्ये सर्व अनावश्यक प्रवास टाळावा. नागरिकांनी स्थानिक बातम्या, अधिकृत घोषणा आणि आपत्कालीन सूचनांवर नियमितपणे लक्ष ठेवावे. कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत, भारतीय नागरिक तेल अवीवमधील भारतीय दूतावासाशी +972-54-7520711 किंवा ई-मेल: cons1.telaviv@mea.gov.in या २४x७ हेल्पलाइनद्वारे संपर्क साधू शकतात”, असंही भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.