Advanced Agni missile : भारताने ८ मे रोजी ओडिशामधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ‘मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल री-एन्ट्री व्हेईकल’ (MIRV) तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या प्रगत ‘अग्नी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. यामुळे एकाच क्षेपणस्त्राने शत्रूचे अनेक तळ उद्ध्वस्त होणार आहे.
या क्षेपणास्त्राची एकापेक्षा जास्त ‘पेलोड्स’सह चाचणी करण्यात आली. हिंदी महासागर क्षेत्रातील मोठ्या भौगोलिक परिसरात विखुरलेल्या वेगवेगळ्या लक्ष्यांवर हे पेलोड्स अचूकपणे डागण्यात आले. जमिनीवरील आणि जहाजांवरील अनेक स्थानकांद्वारे क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणापासून ते लक्ष्यावर आदळण्यापर्यंतच्या संपूर्ण मार्गाचा मागोवा (Telemetry and tracking) घेण्यात आला.
या चाचणीची सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची पुष्टी उड्डाण विदा (Flight data) द्वारे करण्यात आली आहे. या यशस्वी चाचणीमुळे भारताने एकाच क्षेपणास्त्र प्रणालीद्वारे अनेक सामरिक लक्ष्यांना भेदण्याची आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या क्षेपणास्त्राची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) प्रयोगशाळांनी देशभरातील उद्योगांच्या सहकार्याने केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल DRDO, भारतीय सैन्य आणि संबंधित उद्योगांचे अभिनंदन केले. वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, ही चाचणी भारताच्या संरक्षण सज्जतेत प्रचंड भर घालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
