नवी दिल्ली : भारताने लसीकरणात अमेरिकेलाही मागे टाकले आहे. १६ जानेवारी रोजी भारतात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आणि भारताने आतापर्यंत ३२.३६ कोटी लसमात्रा दिल्या आहेत, तर अमेरिकेत १४ डिसेंबर २०२०ला लसीकरण सुरू करण्यात आले असून त्यांनी आतापर्यंत ३२.३३ कोटी लसमात्रा दिल्या आहेत, असे सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

देशात रविवापर्यंत एकूण ३२.३६ कोटी लसमात्रा देण्यात आल्या. आतापर्यंत ४३ लाख २१ हजार ८९८ सत्रे आयोजित करण्यात आली आणि त्याद्वारे एकूण ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ जणांना मात्रा देण्यात आल्या. गेल्या २४ तासात १७ लाख २१ हजार २६८ मात्रा देण्यात आल्या, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यापाठोपाठ ब्रिटन (सात कोटी ६७ लाख ७४ हजार ९९०), जर्मनी (सात कोटी १४ लाख ३७ हजार ५१४), फ्रान्स (पाच कोटी २४ लाख ५७ हजार २८८) आणि इटली (चार कोटी ९६ लाख ५० हजार ७२१) या देशांचा क्रमांक लागतो.

देशात दिवसात ४६ हजार १४८ जणांना लागण

नवी दिल्ली : देशात गेल्या एका दिवसात आणखी ४६ हजार १४८ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या तीन कोटी दोन लाख ७९ हजार ३३१ वर पोहोचली आहे. तर देशात  करोनामुळे गेल्या २४ तासात ९७९ जणांचा मृत्यू झाला असून हा ७६ दिवसांमधील नीचांक आहे, असे सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.