Modi Government Alert : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला. याचे पडसाद आता भारतात उमटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भारतातील संरक्षण यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचे वृत्त वृत्तसंस्थांनी दिले आहे. तसंच, केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आवाहन

गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले वाढवले असून या तिन्ही देशांतील संघर्ष वाढला आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच देशांमध्ये होत असून भारतातही याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे २८ फेब्रुवारी रोजी सर्व राज्यांना पाठवलेल्या पत्रात मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अतिरेकी आणि जागतिक दहशतवादी गटांच्या सोशल मिडिया पोस्ट्सवर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे, असं वृत्त पीटीआयने दिलंय.

तसंच, देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याचीही दक्षता ठेवण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आलाय. तर, इस्रायल आणि अमेरिकेचे वाणिज्य दूतावास आणि इतर राजनैतिक कार्यालये असलेल्या राज्यांना कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी सुरक्षा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

खामेनी यांच्या मृत्यूनंतर भारतात निदर्शने

अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे भारतातही पडसाद उमटले. काश्मीरपासून कर्नाटकपर्यंत विविध शहरांमध्ये मुख्यतः शियापंथीय मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून खामेनी यांच्या मृत्यूबद्दल शोक आणि संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू, श्रीनगर, बारामुल्ला, बडगाम, बांदीपुरा, अनंतनाग आणि पुलवामा येथे मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले होते. यावेळी अमेरिकाविरोधी आणि इस्रायलविरोधी घोषणा देण्यात आल्या.

काश्मीरच्या नेत्यांकडून शांततेचे आवाहन

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इराणमधील घडामोडींबद्दल चिंता व्यक्त केली आणि निदर्शकांना शांततेचे आवाहन केले. सध्या इराणमध्ये असलेले जम्मू-काश्मीरचे विद्यार्थी, रहिवासी यांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यासाठी आपले सरकार परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वयाने काम करत आहे, असे अब्दुल्ला यांनी सांगितले. पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती, काश्मीरचे मुख्य धर्मगुरू मिरवैज उमर फारुख यांनीही खामेनी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.

पंतप्रधानांची सुरक्षा यंत्रणांबरोबर बैठक

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री देशाच्या सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींवरील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची बैठक घेतली. सीसीएसने पश्चिम आशियातील ताज्या संघर्षामुळे उद्भवलेल्या परिस्थिती आणि तेथे अडकलेल्या भारतीयांबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे, असे वृत्तसंस्था पीटीआयने दिले आहे.