INDIA Bloc Parliament March Highlights: मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीने आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी निवडणूक आयोग कार्यालयाबाहेर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांनी आंदोलन केले. मात्र आठ तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर सायंकाळी दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतले.
विरोधकांचा आरोप काय?
निवडणूक आयोगाकडून राबवल्या जाणाऱ्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) प्रक्रियेत गंभीर अनियमितता आणि गडबड असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. निवडणूक आयोगाने ‘फॉर्म ६’ मध्ये बदल करून भाजपाला धार्जिणी भूमिका घेतली, असा आरोप राहुल गांधी यांनीही केला आहे. मात्र, निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
आयोगाने आरोप फेटाळले
दरम्यान, विरोधी पक्षांकडून होणाऱ्या सततच्या टीकेनंतरही निवडणूक आयोगाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “एसआयआर (SIR) प्रक्रियेबाबत तीन सदस्यीय निवडणूक आयोगात मतभेद असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. यासंदर्भातील सर्व निर्णय सर्वानुमते आणि कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करूनच घेण्यात आले आहेत,” असे स्पष्टीकरण आयोगाकडून देण्यात आले आहे.
राजधानीत ‘इंडिया’ आघाडीच्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून, पोलीस प्रशासनाकडून आता बळाचा वापर करण्यात येत आहे. दिल्लीतल्या ‘इंडिया’ आघाडीच्या या मोर्चाचे सगळे लाईव्ह अपडेट्स आपण या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Today’s INDIA Alliance leaders protest march Live News Updates from Delhi, 06 October 2026 | ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत 'इंडिया' आघाडीचा मोर्चा
निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांसह इतर दोन आयुक्तांना भेटण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. जवळपास ३०० खासदार या मोर्चात सहभागी झाल्याचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माध्यमांना सांगितले. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाही निवडणूक आयोगाला भेटू दिले जात नाही, असे सांगताना राहुल गांधी म्हणाले की, ज्यांनी ज्यांनी राष्ट्रद्रोह केला आहे, मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार किंवा सरसंघचालक मोहन भागवत असोत, कुणालाही सोडले जाणार नाही.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधींचे आकाशवाणी भवनात आंदोलन सुरू
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या वतीने राजधानी दिल्लीत काढण्यात आलेल्या भव्य मोर्चादरम्यान हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. विरोधकांचा मोर्चा उधळून लावण्यासाठी पोलिसांकडून कडक नाकेबंदी करण्यात आली होती. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त चकवत थेट आकाशवाणी भवनात प्रवेश केला आणि तेथेच ठिय्या मांडला.
नवीन पटनायक यांच्या 'बीजेडी'ची आंदोलनात उडी
देशातील मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, आता ओडिशातील बिजू जनता दल (BJD) पक्षानेही या विरोधात आंदोलनात उडी घेतली आहे. 'बीजेडी'चे अध्यक्ष नवीन पटनायक यांच्या निर्देशानंतर पक्षाच्या खासदारांनी नवी दिल्लीतील विरोधकांच्या मोर्चात सहभाग नोंदवला आहे.
राहुल, प्रियांका गांधींचा आकाशवाणी भवनातून निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न
ज्ञानेश कुमारांविरोधात ‘इंडिया’ आघाडी आक्रमक झाली आहे. राहुल, प्रियांका गांधी यांनी आकाशवाणी भवनातून निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जीही दिल्ली पोलिसांच्या ताब्यात
मतदार याद्यांच्या पुनरीक्षणातील गैरव्यवहार आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा काढणाऱ्या विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक बड्या खासदारांचा समावेश आहे.
दिल्ली पोलीस आणि खासदारांमध्ये तीव्र बाचाबाची
पोलिसांनी पुढे जाण्यास मज्जाव केल्यानंतर आंदोलक खासदार आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाली. 'लोकशाहीचा गळा आवळला जात आहे' असा आरोप करत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पोलिसांची ही कृती बेकायदेशीर असल्याचे म्हटले. काही वेळातच परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनल्याने पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना बसमध्ये बसवून ताब्यात घेतले आणि अज्ञात स्थळी हलवले.
राहुल गांधींसह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं!
देशाच्या राजधानीत आज राजकीय वातावरण कमालीचे तापले असून मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या (‘इंडिया’ आघाडी) खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काढलेला धडक मोर्चा दिल्ली पोलिसांनी मध्येच रोखला. या दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कारवाई करत राहुल गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ खासदारांना ताब्यात घेतले आहे.
पोलिस बॅरिकेड्सवर चढून ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांची घोषणाबाजी
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान आज दिल्लीच्या रस्त्यांवर कमालीचा राजकीय ड्रामा पाहायला मिळ आहे. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या वतीने आयोजित या आंदोलनात समाजवादी पक्षाच्या (SP) खासदारांचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला. निती आयोगाच्या कार्यालयाजवळ पोलिसांनी उभारलेले सुरक्षेचे भक्कम बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करत, सपाच्या खासदारांनी थेट बॅरिकेड्सवर चढून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मोर्चा अडवल्यानंतर खासदारांचे पार्लमेंट स्ट्रीटवर धरणे आंदोलन
मतदार याद्यांच्या पुनरीक्षणात (SIR) मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षीय 'इंडिया' आघाडीने आज आक्रमक भूमिका घेतली. संसदेच्या मकर द्वारापासून निवडणूक आयोग मुख्यालयाच्या दिशेने निघालेला विरोधी पक्षांच्या खासदारांचा महामोर्चा पोलिसांनी मध्येच रोखला. त्यानंतर संतप्त खासदारांनी पार्लमेंट स्ट्रीटवरच ठिय्या मांडून जोरदार धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मकर द्वारावरून निवडणूक आयोगाकडे कूच; दिल्लीत ठिकठिकाणी नाकेबंदी
मतदार याद्यांच्या दुरुस्तीवरून (SIR) आक्रमक झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या मकर द्वारावरून केंद्रीय निवडणूक आयोग कार्यालयाकडे मोर्चा काढला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्य दिल्लीतील अनेक मुख्य रस्ते बंद करण्यात आले असून वाहतूक वळवण्यात आली आहे.
युवक काँग्रेस कार्यालयाला पोलिसांचे वेढे; कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंग
विरोधकांचा हा मोर्चा रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अत्यंत कडक बंदोबस्त तैनात केला आहे. भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर मोठे बॅरिकेड्स उभारण्यात आले असून, कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभागी होऊ नये यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.
'एसआयआर' प्रक्रियेतील घोळावर आक्षेप; विरोधक थेट राष्ट्रपती भवनात जाणार
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार आणि अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. निवडणूक आयोगावर धडक दिल्यानंतर 'इंडिया' आघाडीचे प्रमुख नेते थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहेत.
राजधानी दिल्लीत सुरक्षेचा चोख बंदोबस्त
विरोधकांच्या या मोठ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. निवडणूक आयोगाचे मुख्यालय आणि राष्ट्रपती भवन परिसरासह सर्व संवेदनशील ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवर गंभीर आरोप
निवडणूक आयोगाकडून राबवल्या जाणाऱ्या 'विशेष सखोल पुनरीक्षण' प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा विरोधकांचा दावा आहे. राहुल गांधी यांनी फॉर्म ६ मधील बदलांवर बोट ठेवताना आयोग सत्ताधारी भाजपाला झुकते माप देत असल्याचा आरोप केला.
निवडणूक आयोग व राष्ट्रपती भवनावर धडक मोर्चा
विरोधी पक्षांच्या खासदारांनी दिल्लीत एकत्र येत केंद्रीय निवडणूक आयोग कार्यालयावर मोर्चा काढला आहे. यानंतर शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन आपली अधिकृत भूमिका मांडणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
मतदार याद्यांच्या पुनरीक्षणातील (SIR) गैरप्रकारांमुळे ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तातडीच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी लावून धरली आहे.

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी 'इंडिया' आघाडीचा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा (छायाचित्र: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
