Future of India Alliance Party : केंद्रातील भाजप सकारच्या विरोधात दोन हात करण्याची क्षमता असणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तर तमिळनाचे मुख्यमंत्री एम. स्टॅलिन यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाने विरोधकांच्या इंडिया आघाडीला मोठा फटका बसला आहे. कारण हे दोन्ही नेते भाजपला भिडत असत. या पराभवाने आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही राज्यांमधील राजकीय समीकरणे बदलू शकतात.

भाजपच्या विरोधी आघाडीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक व समाजवादी पार्टी हे मुख्य पक्ष आहेत. ममता बॅनर्जी यांच्यामुळे पश्चिम बंगाल तर स्टॅलिन यांच्यामुळे तमिळनाडूत विरोधकांच्या आघाडीला बळ मिळाले होते. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी अधिकृतपणे आघाडी करण्याचे टाळले असले तरी भाजपच्या विरोधात दोन्ही पक्ष एकत्र लढा देत असत. अलीकडेच घटना दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पार्टीने एकत्रित मतदान केले होते. मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे घटना दुरुस्ती विधेयक पराभूत झाल्यावर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार या चार पक्षांचा उल्लेख केला होता. या चारही पक्षांना महिला वर्ग माफ करणार नाही, असा इशारा दिला होता.

ममता बॅनर्जी व स्टॅलिन यांच्या पराभवाने विरोधी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ तर तमिळनाडूत ३९ जागा आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूतल्या सर्व ३९ जागा द्रमुक-काँग्रेस व अन्य छोट्या पक्षांच्या आघाडीने जिंकल्या आहेत. पश्चिम बंगालमधील ४२ पैकी २९ जागा ममता यांच्या तृणमूलने तर एक जागा काँग्रेसने जिंकली होती. म्हणजेच दोन्ही राज्यांमधील एकूण ८१ पैकी ६९ जागा या विरोधी आघाडीने जिंकल्या होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीत हाच कल कायम राहण्याबाबत साशंकताच आहे. कारण निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधारी पक्षाची बाजू नेहमीच वरचढ असते.

लोकसभा निवडणुकीला अद्याप तीन वर्षे आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप या काळात तृणमूल काँग्रेसचे पार खच्चीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्षात फूट पाडून तृणमूलची ताकद असलेल्या भागांमध्ये भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न केले जातील. तमिळनाडूतही सत्ताधारी टीव्हीकेचा कारभार कसा असेल यावर सारे अवलंबून असेल. पण भाजप भविष्यातील राजकीय रणनीतीसाठी म्हणून मुख्यमंत्री विजय यांना जवळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. विजय यांचा जोर असाच कायम राहिल्यास द्रमुकला २०१९ व २०२४ प्रमाणे राज्यावरील एकहाती वर्चस्व कायम राखणे कठीण जाईल.

दोघांचा आवाज बंद

केंद्रातील भाजपला आव्हान देण्याची हिंम्मत ममता बॅनर्जी व स्टॅलिन यांनी दाखविली होती. दोघांनीही भाजपला आव्हान दिले होते. यातूनच केंद्रातील भाजपने दोघांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. ममता बॅनर्जी व भाजपमध्ये सतत संघर्ष सुरू असायचा. ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्याची भाजपकडून एकही संधी सोडली जात नसे. त्यासाठी राजभवनाचाही खुबीने वापर करण्यात आला होता. ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांनाही त्यांची जागा दाखवून दिली होती. आर. जी. कार रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. हा मुद्दा भाजपने चांगलाच तापविला होता. त्यावरून ममता बॅनर्जी यांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागली होती. हा अपवाद वगळता ममता बॅनर्जी नेहमीच केंद्र व भाजपशी दोन हात करायच्या.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील यशाने भाजपची ताकद वाढली होती. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपला धोबीपछाड केले होते. भाजपने गेली दोन वर्षे मेहनत घेत निवडणुकीची व्यूहरचना केली. त्यासाठी सारी यंत्रणा कामाला लावली. विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला. गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी आता विरोधात बसावे लागणार आहे. ममता बॅनर्जी या पुन्हा जिंकल्या असत्या तर आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजाविण्याची शक्यता होती. या पराभवाने तृणमूल काँग्रेस एकसंघ ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल. कारण भाजपकडून त्यांना आणखी धक्का देण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणेच तमिळनाडूत मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी भाजपशी कायम संघर्ष केला. अगदी प्रचाराच्या काळात महिला आरक्षण विधेयक काळे कपडे घालून जाळत निषेध व्यक्त केला होता. विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपालांनी संमती देण्याचे नाकारल्याच्या मुद्द्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला. हिंदी लादण्याच्या प्रयत्न असल्याचा आरोप करीत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यास स्टॅलिन यांनी नकार दिला होता. त्यासाठी केंद्राने दोन हजार कोटींचा निधी अडविला होता. हिंदी सक्तीवरून त्यांनी भाजपच्या विरोधात ठोस भूमिका घेतली होती. ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणेच भाजपला त्यांनी आव्हान दिले होते. पण विधानसभा निवडणुकीतील पराभवाने स्टॅलिन यांचाही आवाज बंद झाला आहे.

समाजवादी पार्टीची कसोटी

पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. लोकसभेच्या ८० जागा असलेल्या या राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. समाजवादी पार्टीचे ३७ व काँग्रेसचे सहा असे एकूण ४३ खासदार निवडून आले. याउलट २०१४ व २०१९ मध्ये एकहाती कौल मिळालेल्या भाजपचे ३३ खासदार निवडून आले. उत्तर प्रदेशातील पराभवानेच भाजपची गाडी २४० खासदारांवर थांबली. पक्षाला २७२चा जादुई आकडाही गाठता आला नव्हता. उत्तर प्रदेशात हाच कल कायम राहिल्यास भाजपला सत्ता टिकविणे कठीण जाईल. यामुुळेच भाजपचे केंद्रीय नेते तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सावध झाले आहेत. त्यांनी आतापासूनच राज्यातील राजकीय वातावरण बदलण्यावर भर दिला आहे. मतदारयाद्यांच्या सखोल विशेष फेरतपासणी मोहिमेत उत्तर प्रदेशातील सुमारे दोन कोटी नावे वगळण्यात आली आहेत. पश्चिम बंगालमध्ये ९१ लाख नावे वगळण्यात आली होती. त्याचा भाजपला मोठा फायदा झाला. उत्तर प्रदेशातही याचीच पुनरावृत्ती होऊ शकते. भाजपने सारी ताकद आतापासून पणाला लावली असताना समाजवादी पार्टीचे नेते खासदार अखिलेश यादव यांच्यासमोर लोकसभेचे यश कायम राखण्याचे मोठे आव्हान असेल.

santosh.pradhan@expressindia.com