नवी दिल्ली : ‘इंडिया’ आघाडीच्या मोर्चामध्ये नेहा बोरा सोमवारीही केंद्रबिंदू ठरल्या. ‘इंडिया’ आघाडीचे इतर नेते असतानाही नेहा बोरांकडे लक्ष वेधले जात होते. त्या राहुल गांधी व इतरांबरोबर उघड्या टेम्पोमध्ये होत्या व तिथूनच त्या सातत्याने माध्यमांना प्रतिक्रियाही देत होत्या. कार्यकर्ते त्यांच्याकडून सह्या घेत होते. काही कार्यकर्त्यांनी टोपीवर नेहा बोरांकडून सही घेतली.
दिल्लीमध्ये जंतर मंतर २.० आंदोलनाचे नेतृत्व गेले दोन दिवस नेहा बोरा करताना दिसल्या. पोलिसांना चकवा देत त्यांनी आंदोलन केले. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना कष्ट घ्यावे लागले होते. या आंदोलनामध्ये ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (सीजेपी) नेते सहभागी झालेले नाहीत. आंदोलनाची पुढील दिशा नंतर ठरवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे जंतर-मंतर २.० चे आंदोलन चालवण्यात डाव्या विद्यार्थी संघटनाच आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. ‘इंडिया’ आघाडीमध्ये आम आदमी पक्ष नसल्यामुळे सोमवारच्या मोर्चामध्येही ‘आप’ सहभागी झाला नाही.
अखेर पोलिसांनी अडवले!
बाराखंबा-कॅनॉट प्लेसपासून सुरू झालेला हा मोर्चा तब्बल दोन ते अडीच तास पुढे सरकत होता. सुमारे दोन किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर भगवानदास रोडवर राष्ट्रीय नाट्य अकादमीच्या पुढे पोलिसांनी हा मोर्चा अडवला. सर्वोच्च न्यायालयापासून काही अंतरावर मोर्चाचा मार्ग बंद करण्यात आला. मोर्चाला अडवण्यासाठी दिल्ली पोलिसांसह शीघ्र कृती दल, ‘सीआरपीएफ’ आणि राखीव पोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांकडून सातत्याने जमावबंदी लागू असल्याच्या घोषणा केल्या जात होत्या. रस्त्यावर मोठ्या संख्येने बॅरिकेड्स उभारण्यात आले होते.
संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आंदोलकांना हटवण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी शिट्ट्या वाजवत गर्दीला मागे हटण्याचे आवाहन केले. पदपथावर उभे असलेले पत्रकार, वकील आणि कार्यकर्त्यांनाही बाजूला करण्यात आले. सुमारे सहाच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांना भगवानदास रोडवरून पूर्णपणे मागे हटवले. मात्र, या कारवाईदरम्यान आंदोलकांचा उत्साह कमी झाला नाही. पोलिस शिट्ट्या वाजवत असतानाही ढोल-ताशे सुरू होते. घोषणाबाजीही सुरूच होती.
