नवी दिल्ली : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी गुरुवारी सलग तिसर्‍या दिवशीही शक्तिप्रदर्शन केले. गेल्या दोन दिवसांत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढल्यानंतर गुरुवारी विरोधकांनी राजघाट या महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारीही विरोधी पक्षाच्या खासदारांसाठी भोजनाचे आयोजन केले. भोजनानंतर राहुल गांधी, खरगे, प्रियांका गांधी-वढेरा यांच्यासह विरोधी पक्षांचे खासदार कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत राजघाटाकडे रवाना झाले. ‘इंडिया’ आघाडीचे खासदार शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

१० ऑक्टोबर रोजी, शनिवारी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ व डाव्या विद्यार्थी संघटना, ‘आप’ तसेच इतर जनचळवळीतील संघटनांनी आंदोलनाचे आवाहन केले आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेस थेट सहभागी होण्याबाबत स्पष्टता नाही. मात्र त्याआधी सलग तीन दिवस जबरदस्त आंदोलन करून काँग्रेसने ज्ञानेश कुमार व केंद्र सरकार विरोधात दबाव वाढवला आहे.

विरोधकांची एकजूट

गुरुवारी खरगे यांनी आयोजित केलेल्या भोजनाला काँग्रेसबरोबरच समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि अन्य घटक पक्षांचे खासदार उपस्थित होते. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते भोजन बैठकीत सहभागी झाले. समाजवादी पक्षाचे खासदार, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी तसेच डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित होते.

मुरली मनोहर जोशींची अप्रत्यक्ष चपराक

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांचे आंदोलन सुरू असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी निष्पक्ष निवडणुका, पारदर्शक प्रशासन आणि घटनात्मक व्यवस्थेचे महत्त्व पटवून दिले. निवडणुका निष्पक्ष असतील आणि नोकरशाही पारदर्शक असेल तर जनतेने निवडून दिलेले सरकार टिकून राहते, असे विधान करून केंद्र सरकार व भाजपला अप्रत्यक्ष चपराक दिली.