‘मतचोरी’च्या मुद्द्यावरून देशातील विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. रविवारी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार एल्गार पुकारला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत “ज्ञानेश कुमार पदावरून हटत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असा स्पष्ट इशारा विरोधी नेत्यांनी दिला. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
मिंटो रोड ते रामलीला मैदान दरम्यान काढण्यात आलेल्या या महामोर्च्यात काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि पीडीपीसह विरोधी पक्षांचे हजारो कार्यकर्ते आणि युवा संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘ज्ञानेश कुमार भूगर्भात लपले तरी शोधून काढू’ – मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “मोदी आणि शाह हे महिला, युवक आणि दलितांची मते ‘चोरी’ करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता जनतेनेच त्यांना निवडून दिलेले नाही, तर ते स्वतःच्या सोयीचे मतदार निवडत आहेत,” असा गंभीर आरोप खर्गे यांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्तांना इशारा देताना खर्गे म्हणाले, “ज्ञानेश कुमार जोपर्यंत पद सोडत नाहीत, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. ते अगदी भूगर्भात जाऊन लपले तरी देशातील जनता, महिला आणि तरुण त्यांना शोधून बाहेर काढतील.”
‘ज्यांनी अयोध्येत चंदा चोरला, ते संपणार’ – अखिलेश यादव
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या दानामध्ये झालेल्या चोरीचा मुद्दा उपस्थित करत भाजपावर जोरदार हल्ला चढवला. “ज्यांनी मतचोरी, चंदाचोरी आणि देवाच्या दानाची चोरी केली आहे, त्यांचा अंत निश्चित आहे,” असे अखिलेश म्हणाले.
उत्तर प्रदेशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी दावा केला की, “इंडिया आघाडीने आवाज उठवल्यानंतर आता भाजपालाही जाग आली आहे. यूपीमध्ये भाजपा स्वतःच हिंदूंची मते कापल्याचा दावा करत आहे. भाजपाला देशात फक्त स्वतःच्याच कार्यकर्त्यांना मतदार आणि नागरिक म्हणून पाहायचे आहे.”
‘व्हॅनिश कुमार, तुम्ही कधी गायब होणार?’ – ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या खास शैलीत लहान मुलांच्या कवितेचा संदर्भ देत भाजपा आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर जोरदार टीका केली.
ज्ञानेश कुमार यांच्यावर टिप्पणी करताना त्या म्हणाल्या, “व्हॅनिश कुमार जी, तुम्ही कधी गायब होणार? आम्ही त्याचीच वाट पाहत आहोत.” त्यानंतर कवितेचे विडंबन करत त्या म्हणाल्या, “व्होट चोरी, येस पापा; लोकतंत्र चोरी, येस पापा; लूट किया भाजपा पापा; पडद्यामागे कोण आहे, भाजपा पापा!”
त्या पुढे म्हणाल्या की, मतदार यादी पुनरीक्षणाचा सर्वाधिक फटका बंगालला बसला असून, लोकशाही आणि मतांची मोजणी हायजॅक करणाऱ्यांविरोधात लढा सुरूच राहील. लोकशाही वाचवण्यासाठी न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘आज रामलीला मैदानावर महाभारत घडणार’ – तेजस्वी यादव
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी रामलीला मैदानाचा संदर्भ देत महाभारताचा उल्लेख केला. “हे मैदान सामान्यतः रामायणासाठी ओळखले जाते, पण आज आपण इथे लोकशाही वाचवण्यासाठी ‘महाभारत’ घडवत आहोत. जर आज शकुनी आपली चाल खेळत असेल, तर आपल्याला या मैदानाला कुरुक्षेत्र बनवावेच लागेल,” असे तेजस्वी म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त हे पंतप्रधान मोदींचे बाहुले बनले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘आम्ही या देशासाठी रक्त दिले आहे’ – फारुख अब्दुल्ला व मेहबूबा मुक्ती
जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी भाजपवर मुस्लिम समुदायाला लक्ष्य करत असल्याचा आरोप केला. “मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणून बोट दाखवणाऱ्या भाजप आणि आरएसएसला मला सांगायचे आहे की, आम्ही या देशासाठी रक्त दिले आहे आणि पुढेही देत राहू,” असा घणाघात त्यांनी केला.
तर पीडीपी प्रमुख मेहबूबा मुक्ती यांनी देशाच्या संपत्तीच्या खाजगीकरणावर चिंता व्यक्त केली. “ह्या सरकारने देशाची मालमत्ता एका उद्योगपतीच्या हाती विकली आहे. ज्यांनी भगवान रामाचा चंदाही सोडला नाही, ते हिंदुत्वाची भाषा कशी करू शकतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
