Delhi Police Security AI Surveillance at India Alliance Ramlila Maidan Rally: काँग्रेसप्रणीत ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कडेकोट आणि हाय-टेक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. या सभेवर नजर ठेवण्यासाठी २०० ते २५० उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे, कंट्रोल रूम आणि आणीबाणीच्या प्रसंगी बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग सज्ज ठेवण्यात आले आहेत.

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ही महासभा आयोजित करण्यात आली आहे.

सुमारे १२ एकर परिसरात पसरलेल्या या मैदानावर सुरक्षा दलांची तैनाती सुरू झाली असून सामान तपासणी यंत्रे, मेटल डिटेक्टर्स आणि बॅरिकेड्स बसवण्यात आले आहेत. प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवरील पाळत, गर्दी व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अशा त्रिस्तरीय उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

२५० सीसीटीव्ही आणि ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैदान आणि लगतच्या परिसरावर पाळत ठेवण्यासाठी २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षातून प्रत्येक हालचालीचे थेट प्रक्षेपण पाहिले जाईल, ज्यामुळे गर्दीच्या हालचालींवर तात्काळ लक्ष ठेवणे शक्य होईल.

याशिवाय बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांकडे ‘बॉडी-वॉर्न’ कॅमेरे असतील, तर मैदानाभोवती चेहरे स्कॅन करण्यासाठी AI सक्षम कॅमेऱ्यांचा वापर केला जाईल. मैदानात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या नियंत्रण कक्षातून प्रत्यक्ष जमिनीवरील जवानांना सूचना दिल्या जातील.

संपूर्ण रामलीला मैदानाची १४ झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून, प्रत्येक झोनची जबाबदारी साहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे. हे झोन आठ विभागांत विभागले गेले असून त्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखरेख ठेवतील.

सुमारे ५० हजार लोकांची उपस्थिती गृहीत धरून दिल्ली पोलिसांचे ३,००० ते ३,५०० कर्मचारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मैदानाच्या आठ प्रवेशद्वारांपैकी केवळ तीन प्रवेशद्वारे सर्वसामान्यांसाठी खुली असतील. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वारे राखीव ठेवण्यात आली आहेत. सभेत प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाला दोन स्तरांवर सुरक्षा तपासणीला सामोरे जावे लागेल.

आणीबाणीच्या प्रसंगी बाहेर पडण्यासाठी विशेष व्यवस्था

कोणतीही अनुचित घटना घडल्यास सुरक्षितपणे बाहेर पडता यावे यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार निश्चित करण्यात आले आहे. तसेच सभा संपल्यानंतर किंवा दरम्यान जमावाने शहराच्या इतर भागांत बेकायदा मोर्चा काढू नये, यासाठी पोलिसांकडून गर्दीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.

ही सभा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार असून दिलेल्या वेळेनंतर सभा चालू ठेवण्यास किंवा मैदानात रात्रभर थांबण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.