INDIA Alliance : नवी दिल्लीत ८ जून रोजी इंडिया आघाडीची एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या बैठकीआधीच इंडिया आघाडीत फूट पडल्याची चर्चा रंगली आहे. कारण द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाने या बैठकीत सहभागी न होण्याच याआधीच जाहीर केलेलं आहे.
त्यानंतर आता आम आदमी पक्षही इंडिया आघाडीच्या या बैठकीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाने ८ जूनच्या बैठकीचं निमंत्रण मिळूनही आपण या बैठकीत सहभागी होणार नसल्याचं काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं आहे.
द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष काँग्रेसने तमिळनाडूमध्ये घेतलेल्या भूमिकेवरून नाराज आहे. तमिळनाडूमधील विधानसभेच्या निवडणुकीनंतर जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाला काँग्रेसने पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काँग्रेसने डीएमके बरोबरची युती तोडून टीव्हीकेला पाठिंबा दिला. या कारणावरून डीएमके काँग्रेसवर नाराज झाल्याचं बोललं जात आहे.
आम आदमी पक्षही बैठकीवर बहिष्कार का टाकणार?
नवी दिल्लीत ८ जून रोजी इंडिया आघाडीची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत देशभरातून जवळपास २३ पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, इंडिया आघाडीच्या या बैठकीवर अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा आहे. आम आदमी पक्ष या बैठकीला का उपस्थित राहणार नाही? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
जयराम रमेश यांनी आघाडीच्या बैठकीबाबत काय सांगितलं?
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी सांगितलं की, दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीच्या या बैठकीत २३ राजकीय पक्षांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. ८ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजता ही बैठक पार पडणार आहे, अशी माहिती जयराम रमेश यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये दिली आहे.
ममता बॅनर्जी बैठकीला उपस्थित राहणार
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षात मोठी फूट पडली आहे. तसेच टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार की नाही? याबाबत संभ्रम होता. मात्र, एएनआयच्या एका वृत्तानुसार, तृणमूल काँग्रेसने या बैठकीला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
बैठकीला कोण-कोण उपस्थित राहणार?
दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह २३ पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे. मात्र, इंडिया आघाडीच्या या बैठकीचा नेमकी अजेंडा काय? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
डीएमकेची काँग्रेसवर नाराजी का? काय आहे कारण?
तमिळनाडूमधील विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाला काँग्रेसने पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र, काँग्रेसने डीएमके बरोबरची युती तोडून टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने डीएमके काँग्रेसवर नाराज असल्याचं सांगितलं जातं.

कारण द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाने ८ जूनच्या बैठकीचं निमंत्रण मिळूनही या बैठकीत सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलेलं आहे. डीएमके पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटलंय की, “लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि राज्यांच्या अधिकारांसाठी हानिकारक मानल्या जाणाऱ्या मुद्द्यांना डीएमके पक्षाने सातत्याने विरोध केला. यामध्ये नीट परीक्षा, मतदारसंघ पुनर्रचना, निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांची विशेष सखोल पुनर्तपासणी, निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत आवाज उठवणं, एक राष्ट्र, एक निवडणूक प्रस्ताव आणि वक्फ कायदा व परकीय योगदान नियमन कायद्यातील (FCRA) दुरुस्त्या यासह आदी मुद्यांचा समावेश आहे.”
“इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून डीएमके पक्ष कायम आघाडीबरोबर राहिला. तसेच पक्षाध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांनी महत्त्वाचे राष्ट्रीय मुद्दे समोर आणण्यात महत्त्वाची भूमिका देखील बजावली. मात्र, तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने केलेल्या कथित ‘विश्वासघातामुळे’ डीएमकेचे कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत काँग्रेस उपस्थित असलेल्या बैठकीला आम्ही उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे”, असं डीएमकेने निवेदनात म्हटलेलं आहे.
डीएमके पक्षाने हे स्पष्ट केलं की, “आम्ही बैठकीतून माघार घेतली म्हणजे राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवरून माघार घेतली असं अजिबात नाही. नीट, वक्फ कायदा, एक राष्ट्र, एक निवडणूक, एसआयआर आणि इतर सार्वजनिक मुद्द्यांवर आमची भूमिका कायम राहील आणि राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर इतर मित्रपक्षांना आम्ही पाठिंबा देत राहणार आहोत.”
