INDIA Alliance : तमिळनाडूमधील विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाला काँग्रेसने पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र, काँग्रेसने डीएमके बरोबरची युती तोडून टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने डीएमके काँग्रेसवर नाराज झाल्याचं बोललं जात होतं. आता काँग्रेस आणि डीएमकेमधील नाराजी उघडपणे दिसून येत आहे.
नवी दिल्लीत ८ जून रोजी इंडिया आघाडीची एक महत्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या बैठकीपूर्वी विरोधकांच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाने ८ जूनच्या बैठकीचं निमंत्रण मिळूनही या बैठकीत सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
डीएमके पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटलं की, “लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि राज्यांच्या अधिकारांसाठी हानिकारक मानल्या जाणाऱ्या मुद्द्यांना डीएमके पक्षाने सातत्याने विरोध केला. यामध्ये नीट परीक्षा, मतदारसंघ पुनर्रचना, निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांची विशेष सखोल पुनर्तपासणी, निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत आवाज उठवणं, एक राष्ट्र, एक निवडणूक प्रस्ताव आणि वक्फ कायदा व परकीय योगदान नियमन कायद्यातील (FCRA) दुरुस्त्या यासह आदी मुद्यांचा समावेश आहे.”
“इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून डीएमके पक्ष कायम आघाडीबरोबर राहिला आहे. तसेच पक्षाध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांनी महत्त्वाचे राष्ट्रीय मुद्दे समोर आणण्यात महत्त्वाची भूमिका देखील बजावली आहे. मात्र, तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने केलेल्या कथित ‘विश्वासघातामुळे’ डीएमकेचे कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत काँग्रेस उपस्थित असलेल्या बैठकीला आम्ही उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे”, असं डीएमकेने निवेदनात म्हटलं. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.
तसेच डीएमके पक्षाने हे देखील स्पष्ट केलं की,”आम्ही बैठकीतून माघार घेतली म्हणजे राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवरून माघार घेतली असं अजिबात नाही. नीट, वक्फ कायदा, एक राष्ट्र, एक निवडणूक, एसआयआर आणि इतर सार्वजनिक मुद्द्यांवर आमची भूमिका कायम राहील आणि राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर इतर मित्रपक्षांना आम्ही पाठिंबा देत राहणार आहोत.”

दरम्यान, नवी दिल्लीत ८ जून रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या या बैठकीला जवळपास १७ विरोधी पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे. या बैठकीत देशभरातील अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच इंडिया आघाडीपासून नेहमीच सावध भूमिका घेणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीला कोण उपस्थित राहणार?
नवी दिल्लीत ८ जून रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला विरोधी पक्षातील जवळपास सर्वच नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासह उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री विजय यांनी राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडली
तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी राज्यातील एकमेव राज्यसभेची जागा काँग्रेसला देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री जोसेफ यांच्या या घोषणेमुळे काँग्रेसला मोठा फायदा होणार असून, हे पक्षासाठी मोठं यश मानलं जात आहे. टीव्हीकेने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर निवडणूकपूर्वी डीएमकेबरोबर युतीत असणाऱ्या काँग्रेसने सर्वात पहिल्यांदा जोसेफ यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दर्शवला होता. राज्यात सरकार स्थीर ठेवण्यासाठी टीव्हीकेसाठी काँग्रेसचा पाठिंबा महत्वाचा आहे.

राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय
एका वृत्तानुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तमिळनाडूचे प्रभारी गिरीश चोडणकर आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांची भेट झाल्यानंतर लगेचच ही घोषणा करण्यात आली. यानंतर आता राज्यसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसचे रणनीतिकार प्रवीण चक्रवर्ती हे राज्यसभेसाठीचे उमेदवार असतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. टीव्हीके आणि काँग्रेसच्या युतीसाठी विशेष चक्रवर्ती यांचे मोठं योगदान असल्याचं सांगितलं जातं.
टीव्हीकेच्या निर्णयाचं काँग्रेसकडून स्वागत
मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या घोषणेचं काँग्रेसकडून स्वागत करण्यात आलं आहे. काँग्रेसने याला एक उदार आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं म्हटलं आहे. “यामुळे भाजपाला तोंड देण्यासाठी राज्यसभेत काँग्रेसचा आवाज अधिक मजबूत होईल,” असं काँग्रेस खासदार ज्योतिमणी म्हणाले.
डीएमकेने लोकसभेतील आसनव्यवस्था बदलण्याची केली होती विनंती
काँग्रेस आणि डीएमकेमधील नाराजी आता उघडपणे समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार कनिमोळी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून सभागृहातील आसनव्यवस्थेत बदल करण्याची विनंती केली होती. द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाच्या खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून सभागृहातील डीएमके सदस्यांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्याची विनंती केली होती. बदललेली राजकीय परिस्थिती आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतची पक्षाची युती संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर डीएमके सदस्यांनी काँग्रेस खासदारांसोबत बसणे योग्य होणार नाही असं कनिमोळी यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं होतं.
