पीटीआय, नवी दिल्ली
भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार करारासाठी २३ एप्रिलपासून तीन दिवसीय चर्चा होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. यासाठी भारताकडून तयार करण्यात आलेल्या संदर्भ अटींमध्ये आयातशुल्क, बिगर-शुल्क अडथळे आणि सीमाशुल्क सुविधा अशा विविध १९ प्रकरणांचा समावेश आहे.
द्विपक्षीय व्यापार करारासाठी (बीटीए) चर्चा अधिकृतपणे सुरू करण्यापूर्वी काही विशिष्ट मुद्द्यांवरील मतभेद दूर करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांचे पथक अमेरिकेला जात आहे. हे पथक भारतीय मालावरील आयातशुल्काला अमेरिकेने दिलेली ९० दिवसांच्या स्थगितीला विस्तार आणि संदर्भ अटी या मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. भारताचे वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल हे वाटाघाटी करणाऱ्या पथकाचे नेतृत्व करणार आहेत.
भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी महत्त्वाकांक्षेचा स्तर यावर चर्चा होईल. संदर्भ अटी अधिक विकसित केल्या जातील आणि त्यावर चर्चा होईल. आयातशुल्क, बिगर-शुल्क अडथळे, उगमाविषयी नियम, माल, सेवा, सीमाशुल्क सुविधा आणि नियमनाचे मुद्दे यांचा संदर्भ अटींमध्ये समावेश आहे.