समुद्र असो वा जंगल आम्ही देशातील सर्व भागांमध्ये करोना प्रतिबंधक लस पोचवत आहोत, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. गुरुवारी (७ ऑक्टोबर) मोदी यांनी करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व स्तरावर सुरु असलेल्या भारताच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. “लसीकरण कार्यक्रमासाठी कोविनसारखा एक प्लॅटफॉर्म तयार करून इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण कसं केलं जाऊ शकतं हे भारताने जगाला दाखवून दिलं आहे”, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

एम्स उत्तराखंड येथे एका कार्यक्रमात आज मोदी बोलत होते. ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पीएम केअर्स फंडाअंतर्गत स्थापन झालेल्या ३५ प्रेशर स्विंग अ‍ॅडॉर्सप्शन (पीएसए) ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनासाठी मोदी ऋषिकेशमध्ये दाखल झाले होते. आता देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीएसए ऑक्सिजन प्लांट सुरू होणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे. आतापर्यंत देशभरात पीएम केअर्स फंडाअंतर्गत एकूण १ हजार २२४ पीएसए ऑक्सिजन प्लांट्स देण्यात आले आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंगळवारी (७ ऑक्टोबर) पंतप्रधान मोदी उत्तराखंडला भेट देणार असल्याचा आनंद व्यक्त केला होता. याचं कारण म्हणजे, आजच्या दिवशी मोदी यांनी उत्तराखंडला भेट दिली आहे आणि आजच्याच दिवशी २० वर्षांपूर्वी म्हणजे २००१ मध्ये मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आज मोदींना शासकीय पदावर कार्यरत होऊन २० वर्ष पूर्ण झाली आहेत. हाच दिवस मोदींनी उत्तराखंड दौऱ्यासाठी निवडल्याने आपण आनंदी असल्याचं धामी यांनी म्हटलं होतं.

मोदींनी सक्रीय राजकारणात पूर्ण केली २० वर्षे; भाजपा नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

पंतप्रधान मोदी ७ ऑक्टोबर रोजी केदारनाथलाही भेट देणार असल्याचं वृत्त यापूर्वी आलं होतं. परंतु, उत्तराखंडचे मुख्यमंत्री धमी यांनी मोदींच्या केदारनाथ दौऱ्यासंदर्भांतील वृत्ताला कोणतीही पुष्टी करण्यास नकार दिला.