India-EU Trade Agreement : दोन दशकांच्या चर्चेनंतर आता भारत आणि युरोपिअन युनियनने व्यापक मुक्त व्यापार करारसाठी यशस्वीरित्या चर्चा पूर्ण झाली आहे. यामुळे द्विपक्षीय व्यापारात लक्षणीय वाढ होणार असून गुंतवणूक प्रवाहाला चालना देण्यासाठी आणि दोन्ही बाजूंमधील आर्थिक एकात्मकता वाढविण्यासाठी एक महत्त्वाचा टपा आहे, अंस वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सोमवारी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
भविष्याकडे पाहणारा करार
वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. करार अंतिम झाला आहे, असं अग्रवाल म्हणाले. भारताच्या दृष्टिकोनातून हा करार संतुलित आणि भविष्याकडे पाहणारा आहे आणि देशाला युरोपियन युनियनच्या अर्थव्यवस्थेशी अधिक जवळून जोडण्यास मदत करेल, असं पीटीआयने वृत्त दिलं आहे. तसंच, प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुण्या असलेल्या युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन म्हणाल्या की, “भारत जगाला अधिक स्थिर, समृद्ध आणि सुरक्षित बनवतो.”
भारत जगाला समृद्ध बनवेल
“प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे असणे हा आयुष्यभराचा सन्मान आहे. यशस्वी भारत जगाला अधिक स्थिर, समृद्ध आणि सुरक्षित बनवेल आणि आपल्या सर्वांना त्याचा फायदा होईल”, असं त्यांनी एक्सवर पोस्ट केलंय.
करारावर स्वाक्षरी कधी होणार?
अग्रवाल म्हणाले, सध्या एफटीएच्या मजकुराची कायदेशीर छाननी सुरू आहे. प्रक्रियात्मक औपचारिकता पूर्ण करणे आणि लवकरात लवकर करारावर स्वाक्षरी करणे यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. या वर्षाच्या अखेरिस हा करार होण्याची अपेक्षा आहे आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला तो लागू होऊ शकतो.
सर्व करारांची जननी
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत-ईयू एफटीएचे वर्णन आतापर्यंत भारताने स्वाक्षरी केलेल्या सर्व करारांची जननी असे केले आहे, त्यामुळे त्याचे प्रमाण आणि धोरणात्मक महत्त्व अधोरेखित होते. या कराराची वाटाघाटी २००७ मध्ये सुरू झाल्या. त्यामुळे तो भारतातील सर्वांत जास्त काळ चालणाऱ्या व्यापार चर्चेपैकी एक बनला आहे. या करारात वस्तू,सेवा आणि गुंतवणूक यासह २४ प्रकरणे समाविष्ट आहेत आणि गंतुवणूक संरक्षण आणि भौगोलिक संकेत यावरील समांतर वाटाघाटी देखील आहेत.
