दहाव्या कलाव्यापार मेळ्याचा भर संख्येपेक्षा गुणांवर!

इंडिया आर्ट फेअर’ दिल्लीतील गोविंदपुरी येथे शनिवारपासून लोकांसाठी खुला झाला.

India Art Fair 2018
कलाव्यापार मेळ्याकडे पुष्कळ चित्र-शिल्पे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी म्हणून पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या यंदाही मोठीच आहे.

देशातील सर्वात धनिक कला-व्यापार मेळा समजला जाणारा ‘इंडिया आर्ट फेअर’ दिल्लीतील गोविंदपुरी येथे शनिवारपासून लोकांसाठी खुला झाला. या उपक्रमाच्या यंदाच्या दहाव्या वर्षी व्यवस्थापनात बदल झाला असल्याचे सुपरिणाम दिसू लागले असल्याची प्रतिक्रिया सार्वत्रिक असून, आर्ट फेअरची ही नवी सुरुवात आहे.

महाराष्ट्रातून यंदाच्या आर्ट फेअरसाठी म्हणावे तितके चित्रकार/ कलाविद्यार्थी / कलाप्रेमी आलेले नसले, तरी या कलाव्यापार मेळ्याकडे पुष्कळ चित्र-शिल्पे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी म्हणून पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या यंदाही मोठीच आहे. मात्र, व्यावसायिक गॅलऱ्यांची संख्या जरा कमी करून, काही गॅलऱ्यांना तर चक्क नकार देऊन यंदा कलाविषयक संस्थांना या मेळ्यात अधिक स्थान देण्यात आले आहे. ‘भारतीय कलाबाजार हा पाश्चात्त्य कलाबाजारापेक्षा निराळा आहे, त्याच्या गरजा वेगळ्या आहेत आणि कलेचे भारतीय वर्तमान आणि भविष्य घडविण्यात अनेक संस्थांचाही वाटा आहे, हे जाणूनच यंदा आम्ही आयोजनाची दिशा बदलली.’, असे याविषयी इंडिया आर्ट फेअरच्या नव्या संचालक जगदीप जगपाल यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.

‘इंडिया आर्ट फेअर’ हा उपक्रम ऑगस्ट २००८ पासून ‘इंडिया आर्ट समिट’ या नावाने सुरू झाला; तेव्हापासूनच मोठमोठय़ा व नजर वेधणाऱ्या कलाकृती दाखवणे आणि दर वर्षी सहभागी गॅलऱ्यांची संख्या वाढविणे ही त्याची वैशिष्टय़े राहिली होती. त्या दोहोंना आता लगाम बसला आहे. हे होणे आवश्यक असल्याची कुजबुज गेली काही वर्षे सुरूच होती.. असल्या वाढीमुळे कलेचा इतिहास आणि बाजार यांच्या दरम्यानची दरी अधिकच वाढेल, असा या कुजबुजीचा सूर असे.

अर्थात, संख्यात्मक वाढीच्या त्या ध्यासाने काही फायदेही होते. सर्वात मोठा बौद्धिक लाभ म्हणजे, जागतिक कलाक्षेत्रातील जास्तीत जास्त नामवंतांना फोरम नावाने चालणाऱ्या चर्चासत्रांत स्थान दिले जात असे.  डझनावारी चर्चासत्रांपैकी निवडक दोन-तीन ऐकली, तरी बरेच काही मिळून जाई.

‘हे यंदा आम्ही निर्णयपूर्वक टाळले. त्याऐवजी, वर्षभर काही ना काही शैक्षणिक उपक्रम करता येतील काय, यावर आम्ही भर देऊ आणि त्यासाठी किमान दोन संस्था सध्या आमच्या संपर्कात आहेत.’ असे जगदीप जगपाल यांनी सांगितले.

 

क्युरेटर किंवा मोठय़ा कला-उपक्रमाच्या नियोजकाचं काम हे एका अर्थी संपादनकार्यासारखं असतं. त्या अर्थानं, (फेअरची) इतकी सुसंपादित आवृत्ती प्रथमच दिसते आहे. 

– अभय सरदेसाई (आर्ट इंडिया या त्रमासिकाचे संपादक / या नियतकालिकातर्फे प्रत्येक कला- व्यापार मेळ्यात सहभागी)

 

यंदाचा फेअर आकारानं काहीसा लहान आहे कबूल, पण तेच बरं आहे!  संख्येपेक्षा जी गुणात्मक वाढ दिसायला हवी, ती यंदा दिसते आहे.

– तस्नीम मेहता – झकारिया (मुंबई महापालिकेच्या भाऊ दाजी लाड संग्रहालयाला नवजीवन देणाऱ्या संग्रहालय नियोजक)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India art fair opened in govindpuri in delhi for people from saturday