इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर; २०२० पर्यंत मोठा पल्ला गाठण्याचे संकेत

दळणवळण मंत्री मनोज सिन्हा यांची माहिती

भारतातील इंटरनेट ग्राहकांची संख्या २०१६ अखेरीस ३९१.५० दशलक्ष इतकी वाढली असून इंटरनेट वापरात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे असे दळणवळण मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले आहे. टेलिकॉम इंडियावरील कार्यशाळेत ते आज बोलत होते. २०२० पर्यंत भारतीय दूरसंचार उद्योग ६६ हजार कोटी रुपयांचा टप्पा पार करेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत, ‘भारत नेट’ हा प्रकल्प राबवण्यात येत असून २०१८ पर्यंत देशातल्या अडीच लाख ग्रामपंचायतींना अतिजलद ऑप्टिकल फायबर केबल्सनी जोडण्यात येणार आहे असे सिन्हा यावेळी म्हणाले. टप्याटप्यात हा प्रकल्प राबवण्यात येत असून जुलै २०१७ पर्यंत १ लाखांहून अधिक ग्रामपंचायती जोडण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केरळ, कर्नाटक, हरयाणा, उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यात ही कामे जवळजवळ पूर्ण झाली आहेत.

सिन्हा म्हणाले, २०१६ मध्ये भारतात मोबाईल डेटा वापरामध्ये ७६ टक्के वाढ झाली आहे. स्मार्टफोन्सचा वापर वाढल्याने ही वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. शहरी भागात याचे प्रमाण अधिक आहे. २०२१ पर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून व्हिडिओज वापरणाऱ्यांच्या संख्येतही ७६ टक्के वाढ होईल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे, २०१६मध्ये याचे प्रमाण ४९ टक्के इतके होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India at second place for uses of internet says manoj sinha