India to supply 5000 tonnes of Diesel to Bangladesh: पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असताना भारताने आसाममधील नुमालीगड रिफायनरीतून पाइपलाइनद्वारे बांगलादेशला डिझेलचा पुरवठा सुरू केला आहे. मंगळवारी (१० मार्च) या पाइपलाइनद्वारे किमान ५,००० टन डिझेल बांगलादेशमध्ये पोहोचणार असल्याची माहिती बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष मुहम्मद रेझानुर रहमान यांनी दिली.

अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून बांगलादेशमध्ये इंधनटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडून करण्यात आलेला हा पुरवठा दोन्ही देशांमधील वार्षिक कराराचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.

२०२३ साली पाइपलाइनचे उद्घाटन

बीपीसीमधील सूत्रांनी ढाका येथील ‘द फायनान्शियल एक्सप्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, आसाममधील नुमालीगड रिफायनरीतून भारत-बांगलादेश मैत्री पाइपलाइनद्वारे डिझेल उत्तर बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यातील पार्वतीपूर डेपोपर्यंत पोहोचवले जात आहे. मार्च २०२३ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी या पाइपलाइनचे उद्घाटन केले होते.

कराराला दिली होती स्थगिती

या पुरवठ्यामुळे बांगलादेशमधील वीज निर्मिती आणि वाहतूक व्यवस्थेवरील तात्काळ दबाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशचे भारतावरील ऊर्जा अवलंबित्व तणावपूर्ण झाले होते. त्यानंतर सत्तेवर आलेल्या मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम प्रशासनाने भारतासोबत झालेल्या काही ऊर्जा करारांचा आढावा घेऊन काही करार अंशतः स्थगित केले होते.

या काळात झारखंडमधील अदानी समूहाच्या वीज प्रकल्पातून होणारी वीज आयात कमी झाली, तसेच कोळसा आणि काही सीमापार गॅस व एलएनजी प्रकल्पांमध्येही अडथळे निर्माण झाले. अशा परिस्थितीत भारताकडून करण्यात आलेला ताजा डिझेल पुरवठा दोन्ही देशांतील ऊर्जा सहकार्य पुन्हा स्थिर होत असल्याचे संकेत मानले जात आहेत.

१ लाख ८० हजार टन डिझेल दिले जाणार

भारत-बांगलादेश मैत्री पाइपलाइन सुरू होण्यापूर्वी बांगलादेशला डिझेल पाठवण्यासाठी रेल्वे टँकरचा वापर केला जात होता. सध्याच्या करारानुसार भारत दरवर्षी पाइपलाइनद्वारे बांगलादेशला १ लाख ८० हजार टन डिझेल पुरवणार आहे. मंगळवारी पाठवण्यात आलेले ५,००० टन डिझेल हे या वार्षिक करारातील पहिला हप्ता असल्याचे बीपीसीचे अध्यक्ष मुहम्मद रेझानुर रहमान यांनी सांगितले.