India Bangladesh Intelligence Chiefs Meet for Bilateral Security: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतर अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंवर अत्याचार करण्यात आले. डिसेंबर २०२५ मध्ये अनेक हिंदूंची जमावाच्या मारहाणीत हत्या करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेशमध्ये बीएनपी पक्षाचे सरकार आले आणि तारीक रेहमान पंतप्रधानपदी आरूढ झाले. त्यानंतर आता मोठी घडामोड घडल्याचे समोर आले आहे. बांगलादेशच्या गुप्तहेर प्रमुखांनी भारताच्या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.
द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ फोर्सेस इंटेलिजेंस (DGFI) या बांगलादेशच्या सर्वोच्च संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक मेजर जनरल कैसर रशीद चौधरी यांनी १ ते ३ मार्च दरम्यान दिल्लीचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी रॉचे प्रमुख पराग जैन आणि लष्करी गुप्तचर संस्थेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल आरएस रमण यांची भेट घेतली.
तारीक रेहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पाच दिवसांनी २२ फेब्रुवारी रोजी कैसर रशीद यांची ब्रिगेडियर जनरल या पदावरून मेजर जनरल या पदावर बढती केली आणि त्यांना DGFI संस्थेचे महासंचालक पद दिले.
द इंडियन एक्सप्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उभय राष्ट्रातील गुप्तचर प्रमुखांनी २ मार्च रोजी खासगी स्नेहभोजन घेतले. यावेळी त्यांनी गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि सुरक्षा विषयांशी संबंधित भागीदारीवर सविस्तर चर्चा केली.
बांगलादेशमधील भारतविरोधी कारवायाबद्दल केंद्र सरकारने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशमधील नव्या सरकारबरोबर यावर काम करण्यास केंद्र सरकार इच्छुक आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात बांगलादेशमधील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली होती, याचे मूल्यांकन उभय राष्ट्राच्या बैठकीत करण्यात आले.
या बैठकीच्या एक आठवड्यानंतर ८ मार्च रोजी बांगलादेशमधील विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्या हत्या प्रकरणात बांगलादेशी नागरिक असलेल्या दोन आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली, अशी माहिती विशेष कार्य दलाने रविवारी दिली.
उस्मान हादीवर १२ डिसेंबर २०२५ रोजी ढाका येथे गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान १८ डिसेंबर रोजी त्याचा सिंगापूर येथे मृत्यू झाला. ३२ वर्षीय हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळला, त्यानंतर अनेक हिंदू नागरिकांची हत्या करण्यात आली.
