India Bangladesh Relations : बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून तारिक रहमान यांनी १८ फेब्रुवारी रोजी शपथ घेतली आहे. बांगलादेशात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तारिक रहमान यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीला (बीएनपी) मोठं यश मिळालं आहे. दरम्यान, तारिक रहमान यांनी बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून शपथ घेताच भारत एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

भारत बांगलादेशातील सर्व व्हिसा सेवा पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशातील भारताचे वरिष्ठ वाणिज्य दूतावास अनिरुद्ध दास यांनी या संदर्भातील संकेत दिले आहेत. ‘दिल्ली लवकरच बांगलादेशमधील सर्व व्हिसा सेवा पूर्णपणे सुरू करेल’, असं अनिरुद्ध दास यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता बांगलादेश आणि भारतामधील संबंध सुधारण्याची चिन्ह आहेत. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

दूतावास अनिरुद्ध दास यांनी गुरुवारी भारत-बांगलादेश संबंध मजबूत करण्यासाठी पूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलं. तसेच व्हिसा सेवा पुन्हा पूर्व स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. एका पत्रकार परिषदेत बोलताना अनिरुद्ध दास म्हणाले की, “सध्या वैद्यकीय आणि दुहेरी प्रवेश व्हिसा जारी केले जात आहेत आणि प्रवास व्हिसासह इतर श्रेणी पुन्हा सुरू करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.”

अनिरुद्ध दास पुढे म्हणाले की, “भारत-बांगलादेश संबंध परस्पर आदर आणि सामायिक हितसंबंधांवर आधारित आहेत. दोन्ही देशांचे लोक स्थिर, सकारात्मक, रचनात्मक, दीर्घकालीन आणि परस्पर फायदेशीर संबंधांचे प्रमुख भागधारक आहेत. दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक संबंध आणि समान उद्दिष्टे असून सहकार्य कायमच नवीन संधी निर्माण करण्यास मदत करू शकते.”

भारताने व्हिसा सेवा का बंद केली होती?

बांगलादेशात मागील काही महिन्यांपूर्वी जाळपोळ आणि हिंसक आंदोलने सुरू होते. तेव्हा भारत आणि बांगलादेशातील तणाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर भारताने १७ डिसेंबर २०२५ रोजी बांगलादेशातील व्हिसा सेवा निलंबित केली होती. मात्र, आता निवडणुकीनंतर बांगलादेशात तारिक रहमान पंतप्रधान झाल्यानंतर भारत आणि बांगलादेशातील संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचं दिसत आहे.

तारिक रहमान कोण आहेत?

तारिक रहमान हे बांगलादेश नॅशनल पार्टीच्या कार्यकारी अध्यक्षा आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान जिया खलिदा यांचे पुत्र आहेत. तारिक रहमान यांना बांगलादेशच्या राजकारणात क्राऊन प्रिन्स असं म्हटलं जातं. बांगलादेशचे संस्थाप आणि लष्कराचे प्रमुख तसंच माजी राष्ट्रपती जियाउर रहमान यांचे ते सर्वात लहान पुत्र आहेत. त्यांची आई खलीदा जिया या तीनदा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या होत्या. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला तारिक बीएनपीमध्ये एक महत्त्वाचा चेहरा म्हणून उदयास आले. खलीदा जियांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडेच पाहिलं जातं.