सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. कोविड १९ च्या काळात अर्थात करोना काळात गेल्या काही महिन्यांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात झाला आहे. देशातील कांद्याच्या दरांमध्ये झालेली वाढ थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. डायरेक्ट्ररेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) ने एक नोटिफिकेशन काढून सगळ्या प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदी असल्याचं जाहीर केलं आहे. हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे. बंगळुरु आणि कृष्णापुरम येथील कांद्यावरही निर्यातबंदी लागू करण्यात आली आहे.आत्तापर्यंत या कांद्याच्या निर्यातीवर बंदी लावण्यात आली नव्हती. मात्र आता या कांद्याच्या बाबतीतही सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे.

 

एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात कांद्याच्या किंमती वाढल्या आहेत. एवढंच नाही तर करोना काळात म्हणजेच गेल्या काही महिन्यांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात झाला आहे. भारताने एप्रिल ते जून या कालावधीत १९.८ कोटी डॉलर किंमतीचा कांदा निर्यात केला. तर मागच्या संपूर्ण वर्षात ४४ कोटी डॉलर्सचा कांदा निर्यात झाला होता. भारतातून बांगलादेश, मलेशिया, युएई आणि श्रीलंका या देशांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात होतो.

कांद्याच्या किंमती वाढल्या
कांद्याच्या प्रति किलो दरांमध्ये वाढ झाली आहे. १५ ते २० रुपये प्रति किलोने विकला जाणारा कांदा ४५ ते ५० रुपये प्रति किलो या दराने मिळतो आहे. देशभरातच हे दर वाढले आहेत. दिल्लीतल्या आझादपूर बाजारात कांद्याचा घाऊक दर २६ रुपये ते ३७ रुपये प्रति किलो इतका होता. या कारणांमुळे कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.

सप्टेंबर २०१९ मध्येही मोदी सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत आल्याने त्यावेळीही कांद्याच्या किंमती वाढल्या होत्या.