Delhi INDIA Bloc Protest राहुल गांधी ३०० जणांसह राजघाट या ठिकाणी आंदोलनासाठी गेले आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाच्या खासदारांना जेवणासाठी बोलवलं होतं लंचच्या नंतर सगळेच खासदार हे आंदोलनाच्या तयारीत आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह विरोधी पक्षातले खासदार राजघाटवर जाण्याची तयारी करत आहेत. याआधी ७ ऑक्टोबरला जेव्हा राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह खासदार आंदोलन करण्यासाठी जंतर मंतर या ठिकाणी पोहचले तेव्हा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दोन तासांनी त्यांना सोडण्यात आलं. या प्रकरणी काही नेत्यांवर FIR ही दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही आंदोलनात सहभागी झाले आहेत. तसंच केसी वेणुगोपाल, पवन खेरा, प्रणव झा, प्रणिती शिंदे यांच्यास काँग्रेसचे अनेक खासदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. महात्मा गांधींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. भाजपाने ते हिरावून घेतलं आहे असं मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटलं आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन करण्यात येतं आहे. ज्ञानेश कुमार यांनी भाजपाची मदत केली आणि मतचोरी केली असा आरोप आहे. जाणून घेऊ या संदर्भातल्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा आवाज ऐकला पाहिजे-गौरव गोगोई
राजघाट या ठिकाणी पोहचल्यानंतर काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की आम्ही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची पुन्हा एकदा मागणी करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेसमोर नतमस्तक होतात आणि स्वतःला प्रधानसेवक असं म्हणतात. मग आमची मागणी आहे की त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, देशाचा आवाज ऐकावा. निवडणुका निवडणूक आयोगाच्या मदतीने जिंकणं योग्य नाही, ज्ञानेश कुमार यांना त्यांनी पदावरून काढून टाकलं पाहिजे किंवा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अशी मागणीही गौरव गोगोई यांनी केली.
राजघाट या ठिकाणी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचं ठिय्या आंदोलन
इंडिया आघाडीच्या खासदारांचं राजघाट या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू झालं आहे. राजघाट या ठिकाणी राहुल गांधी आले. तिथे त्यांनी महात्मा गांधी यांच्या समाधीला अभिवादन केलं. त्यानंतर आता राजघाट या ठिकाणी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी तसंच विरोधी पक्षातले खासदार बसले आहेत.
कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे रस्त्यावर उतरून मिळत नाही-प्रदीप भंडारी यांची टीका
भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राजघाट या ठिकाणी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींच्या नेतृत्वात जे आंदोलन होतं आहे त्यावर टीका केली. प्रदीप भंडारी म्हणाले, लोकशाहीत कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे रस्त्यावर उतरून मिळत नाही. जर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे तर रस्त्यावर गर्दी जमवून आणि आंदोलन करून काय होणार आहे? काँग्रेस देशातल्या घटनात्मक संस्थांबाबत अविश्वास पसरवू पाहतं आहे असाही आरोप प्रदीप भंडारी यांनी केला आहे.
विरोधी खासदार राजघाटावर पहोचले, आता धरणे आंदोलन
काँग्रेससह विरोधी पक्षांचे खासदार हे राजघाट या ठिकाणी पोहचले आहेत. या आंदोलनात युथ काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आले आहेत. मागच्या दोन दिवसांपासून विरोधी खासदारांचं ज्ञानेश कुमारांना हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आता तिसऱ्या दिवशी हे सगळेजण राजघाट या ठिकाणी पोहचले आहेत.
मोदी, शाह, ज्ञानेश कुमार यांनी देशाचं संविधान संपुष्टात आणलं-राहुल गांधी
राजघाटावर आंदोलनासाठी जाण्यापूर्वी राहुल गांधी म्हणाले, ३०० खासदारांसह आम्ही राजघाट या ठिकाणी आंदोलनासाठी जात आहोत. आम्ही शांततामार्गाने आंदोलन करत आहोत. पण मागच्या दोन दिवसांपासून आम्हाला थांबवण्यात येतं आहे. सुरूवातीला आम्हाला निवडणूक आयोगासमोर आंदोलन करू दिलं नाही. दुसऱ्या दिवशी आम्हाला जंतर-मंतर या ठिकाणी आंदोलन करू दिलं नाही. आमच्या आंदोलकांना मारहाण करण्यात आली. वास्तव हे आहे की नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, ज्ञानेश कुमार यांनी देशाचं संविधान संपुष्टात आणलं आहे, मतचोरी केली आहे आणि आता विरोधक म्हणून आम्ही सांगत आहोत की यात न्याय मिळणार आहे.
महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, भाजपाने हिरावून घेतलं आहे-खरगे
ज्ञानेश कुमारांचा गुन्हेगारी कट, लोकशाही नष्ट करण्याचं षडयंत्र त्यांनी रचलं आहे. आम्ही राजघाटावर जाऊन धरणे आंदोलन करणार आहोत. त्या आम्ही हीच प्रार्थना करणार आहोत की भाजपा सरकारला, मोदींना, अमित शाह यांना सद्बुद्धी मिळू दे. व्होटचोरीचं प्रकरण, वाढती महागाई, तरूणांचे प्रश्न या सगळ्या समस्या भाजपानेच उभ्या केल्या आहेत असा आरोप मल्लिकार्जुन खरगेंनी केला आहे. महात्मा गांधींमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं, भाजपाने ते हिरावण्याचा कट रचला आहे असाही आरोप खरगेंनी केला.
