‘मायक्रोसॉफ्ट’ या जगातील सर्वात मोठय़ा सॉफ्टवेअर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर ज्या व्यक्तींची निवड होण्याची शक्यता आहे त्यात पहिल्या दोन नावांत जन्माने भारतीय असलेले मायक्रोसॉफ्टचे अधिकारी सत्या नाडेला यांचा समावेश आहे. पुढचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांचेच नाव आघाडीवर आहे. प्रदीर्घ काळ मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले स्टीव्ह बॉलमेर यांची जागा ते घेऊ शकतील. वॉल स्ट्रीट जर्नलच्या ऑल द थिंग्ज ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, मायक्रोसॉफ्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदासाठी फोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलन मुलाले व नाडेला यांची नावे आघाडीवर आहेत.
नाडेला हे ‘क्लाउड अँड एंटरप्राइज’ या मायक्रोसॉफ्टच्याच विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष असून मायक्रोसॉफ्टमध्ये येण्यापूर्वी ते सन मायक्रोसिस्टीम्समध्ये काम करीत होते. नाडेला हे मूळचे हैदराबादचे असून त्यांनी मंगलोर विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकीत पदवी घेतली, नंतर त्यांनी विस्कॉन्सिन विद्यापीठातून संगणक विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली. शिकागो विद्यापीठातून त्यांनी उद्योग व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी घेतली.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, मुलाले यांचे नाव मायक्रोसॉफ्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदासाठी आघाडीवर असण्यात प्रमुख कारण म्हणजे ते जास्त काळजी घेणारे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, त्यांचा अनुभव मोठा आहे व कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्यात त्यांच्यासारखा करिश्मा कुणाकडे नाही. त्यामुळे ते कंपनीला योग्य मार्गाने नेऊ शकतात. असे असले तरी सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी होण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे.
मायक्रोसॉफ्टचे माजी कार्यकारी अधिकारी टोनी बेटस व नोकिया ओवायजेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन इलॉप यांचीही नावे या पदासाठी चर्चेत आहेत, पण त्यांच्या निवडीची शक्यता फार कमी आहे.