Two more Indian LPG tankers are ready to navigate the high-risk Strait of Hormuz : गेल्या २४ तासांत क्रूड ऑईलची (कच्चे तेल) वाहतूक ठप्प झालेली असतानाही, भारतीय ध्वज असलेली दोन एलपीजी (द्रवरूप पेट्रोलियम गॅस) टँकर्स येत्या काही दिवसांत ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ पार करण्याच्या तयारीत आहेत, असं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.
शिपिंग डेटा आणि व्यापारी सूत्रांनुसार, प्रादेशिक तणावामुळे शेकडो जहाजे नांगरलेली असताना ही दोन जहाजे थोड्या विश्रांतीनंतर आपला प्रवास पुन्हा सुरू करणार आहेत. जागतिक ऊर्जा प्रवाहासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली हॉर्मुझची सामुद्रधुनी सध्या विस्कळीत झाली आहे; कारण इराणने आखातातून बाहेर पडणाऱ्या जहाजांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला आहे. जगातील एकूण तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के पुरवठा याच अरुंद मार्गावरून होतो.
शुक्रवारच्या बाजार अंदाजानुसार गेल्या २४ तासांत एकाही कच्च्या तेलाच्या टँकरने ही सामुद्रधुनी ओलांडलेली नाही. ‘केपलर’च्या (Kpler) आकडेवारीनुसार, अमेरिकेचे निर्बंध असलेले एक रिकामे तेलवाहू जहाज १८ मार्च रोजी पुन्हा इराणच्या सागरी हद्दीच्या दिशेने वळले.
भारतीय टँकर्सकडून हालचालींचे संकेत
या पार्श्वभूमीवर, ‘पाइन गॅस’ आणि ‘जग वसंत’ ही दोन भारतीय एलपीजी जहाजे संयुक्त अरब अमिरातीमधील शारजाहजवळ उभी आहेत. ‘मरीन ट्रॅफिक’च्या (MarineTraffic) शिप-ट्रॅकिंग डेटानुसार, ही दोन्ही जहाजे प्रवासासाठी सज्ज असल्याचे संकेत देत आहेत. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यापारी सूत्राने सांगितले की, ही टँकर्स कदाचित शनिवारी प्रवासाला सुरुवात करू शकतात, मात्र अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. तर, भारत सरकारच्या जहाजबांधणी मंत्रालयातील विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी या हालचालींबाबत विचारले असता, सध्या सविस्तर माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले, असं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.
मर्यादित आणि निवडक वाहतूक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात इराणने भारतीय ध्वज असलेल्या दोन एलपीजी टँकर्सना ही सामुद्रधुनी ओलांडण्याची परवानगी दिली होती. यावरून असे दिसून येते की, काही जहाजांच्या वाहतुकीबाबत अद्यापही प्रत्येक जहाजाच्या परिस्थितीनुसार वाटाघाटी केल्या जात आहेत. शिप-ट्रॅकिंगच्या ताज्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानच्या दिशेने जाणारे एक तेलवाहू जहाज हा मार्ग यशस्वीरित्या पार करताना दिसले. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष सुरू असतानाही मर्यादित प्रमाणात वाहतूक सुरू असल्याचे हे संकेत आहेत. सध्या या दोन भारतीय टँकर्सच्या नियोजित हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे, कारण यावरून जगातील सर्वात संवेदनशील ऊर्जा मार्गावरून व्यावसायिक वाहतूक पुन्हा सुरू होणार का, याचे संकेत मिळतील.
