पीटीआय, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्यात झालेल्या व्यापक चर्चेनंतर भारत आणि ब्राझीलने पुढील पाच वर्षांत वार्षिक द्विपक्षीय व्यापार २० अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य निश्चित केले. त्याबरोबरच महत्त्वपूर्ण खनिज क्षेत्रातील सहकार्यासाठी करारावर शनिवारी स्वाक्षरी केली.

दोन्ही नेत्यांदरम्यान अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आयातशुल्कासंबंधी निकालावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्याबरोबरच संरक्षण, ऊर्जा, आरोग्य व डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यांसह विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

जागतिक भूराजकीय वातावरणात अधिक सखोल धोरणात्मक भागीदारी आवश्यक असल्यावरही भर देण्यात आला. दहशतवाद आणि त्याला पाठिंबा देणारे घटक हे मानवतेचे शत्रू आहेत, यावर दोन्ही देशांचे एकमत झाल्याचे मोदी म्हणाले.

निर्यात .७७ अब्ज डॉलर

२०२४-२५ मध्ये भारत-ब्राझील व्यापाराचे प्रमाण १२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले. यात भारताची निर्यात ६.७७ अब्ज डॉलर्स तर ब्राझीलकडून आयात ५.४३ अब्ज डॉलर होती.