वॉशिंग्टन : भारताने गरजेपोटी रशियासोबत भागीदारी केली, कारण अमेरिका यापूर्वी असे करण्याच्या स्थितीत नव्हती, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी काँग्रेसपुढील एका सुनावणीत सांगितले. अमेरिका आता त्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अतिशय महत्त्वाची ठरण्याची आणि येती काही दशके पुढे वाटचाल करण्यातील आधार बनण्याची क्षमता भारत- अमेरिका यांच्यातील भागीदारीत आहे, असे ‘सिनेट अॅप्रॉप्रिएशन्स सब कमिटी ऑन स्टेट, फॉरेन ऑपरेशन्स’ने काँग्रेसपुढे घेतलेल्या सुनावणीदरम्यान ब्लिंकन यांनी सांगितले.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केलेले असताना; भारतासह इतर देशांनी रशियावर निर्बंध लादावेत आणि रशियाची शस्त्रे, तेल व इतर वस्तूंवर असलेले त्यांचे अवलंबित्व कमी करावे यासाठी अमेरिका त्यांना भरीस घालत आहे.
‘भारताच्या बाबतीत, रशियाचे अनेक दशके जुने संबंध आहेत. भारताने रशियाला गरजेपोटी पसंतीचा भागीदार बनवले, ज्या वेळी आम्ही त्यांचे भागीदार बनण्याच्या स्थितीत नव्हतो’, असे सिनेटर विल्यम हॅगेर्टी यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ब्लिंकन म्हणाले.
‘आता आम्ही त्या दृष्टीने गुंतवणूक करत आहोत. अमेरिका व भारत यांच्यात वाढते धोरणात्मक अभिसरण (स्ट्रॅटेजिक कन्व्हर्जन्स) असल्याचे माझे मत आहे. आणि अर्थातच, चीन हे त्याचे मोठे कारण आहे’, असे ब्लिंकन म्हणाले. रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर असलेले हॅगेर्टी यांनी भारत- अमेरिका संबंधांबाबत िब्लकन यांचे मत विचारले होते.