India Russia Oil Trade : रशियाकडून तेल खरेदीचा मुद्दा, टॅरिफ आणि व्यापार करार अशा मुद्यावरून भारत आणि अमेरिकेत मागील काही महिन्यांपासून तणाव आहे. मात्र, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एक दावा केला की, अमेरिका आणि भारत यांच्यात एक व्यापारी करार झाला आणि अमेरिकन बाजारपेठेत होणाऱ्या भारतीय निर्यातीवरील शुल्कात (टॅरिफ) मोठी कपात करण्यात येईल.

ट्रम्प यांच्या दाव्यानुसार भारतीय वस्तूंवरील टॅरिफ १८ टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल. मात्र, त्यासाठी अमेरिकन उत्पादनांची आयात वाढवावी लागेल आणि रशियन तेलाची खरेदी थांबवावी लागेल. पण ट्रम्प यांच्या या दाव्याला भारत सरकार किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल खरेदी त्वरित थांबवण्याच्या कराराला दुजोरा दिलेला नाही.

भारत व्हेनेझुएलाच्या तेल खरेदीच्या चर्चा सुरू असल्याच्या घडामोडींवर आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर आता रशियाची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘भारत कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करण्यास स्वतंत्र आहे’, असं रशियाने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, “भारत कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करण्यासाठी स्वतंत्र आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठादारांमध्ये विविधता आणण्याच्या त्यांच्या निर्णयात काहीही नवीन नाही”, असं त्यांनी म्हटलं. “आम्हाला आणि इतर सर्व आंतरराष्ट्रीय ऊर्जा तज्ञांना हे चांगलं माहिती आहे की रशिया हा भारताला तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचा एकमेव पुरवठादार नाही. भारत नेहमीच इतर देशांकडून ही उत्पादने खरेदी करत आला असून आम्हाला यात काहीही नवीन वाटत नाही.”

दरम्यान, भारताने रशियन तेल खरेदी थांबवून अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून कच्च तेल खरेदी करण्यास सहमती दर्शविल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता, याबाबत रशियाच्या दिमित्री पेस्कोव्ह यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, “तेल खरेदी थांबवण्याबाबत भारताकडून रशियाला अद्याप असं अधिकृत कोणतंही निवेदन मिळालेलं नाही.”