पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या भाषणात शस्त्रास्त्रनिर्मिती आणि लष्करी साहित्याच्याबाबतीत देशाने स्वयंपूर्ण होण्याची गरज व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर , भारताकडे इतर देशांना लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे निर्यात करण्याची क्षमता असल्याचे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(डीआरडीओ)चे प्रमुख अजित दुबे यांनी सांगितले. चीनशी तुलना करता भारत फार कमी उत्पादनखर्चात शस्त्रास्त्रांची निर्मिती करू शकतो असे मत अजित दुबे यांनी व्यक्त केले. लष्करी साहित्याच्या निर्यातीमध्ये अग्रेसर ठरण्यासाठी या क्षेत्रासाठी विशिष्ट धोरण हाती घेण्याची गरज आहे. याबाबतचे निर्णय जलद गतीने घेण्यासाठी संरक्षण संशोधन समितीने ‘एक खिडकी योजना’ अंमलात आणण्याची मागणी केली होती असे त्यांनी सांगितले.