नवी दिल्ली : भारत आणि कॅनडा यांनी द्विपक्षीय संबंधांना नवे बळ देत व्यापक आर्थिक भागीदारी करारासाठी अटींवर सहमती दर्शवली आहे. तसेच २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार ५० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य नि्च्तित करण्यात आले आहे. सध्या हा व्यापार सुमारे ९ अब्ज डॉलर्स (२०२४—२५) इतका आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. मुक्त व्यापार करार यावर्षाअखेरीस पूर्ण करण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न राहील, असे कार्नी यांनी सांगितले.
नागरी अणुऊर्जा क्षेत्रात भारत आणि कॅनडा यांच्यात २.६ अब्ज डॉलर्सचा दीर्घकालीन युरेनियम पुरवठा करार करण्यात आला. कॅनडातील आघाडीची कंपनी कॅमिको भारताला युरेनियम पुरवणार असून, लघु मॉड्युलर अणुभट्ट्या आणि प्रगत अणुभट्ट्यांच्या उभारणीत सहकार्य करण्यात येणार आहे. स्वच्छ व विश्वसार्ह बेसलोड वीज निर्मितीसाठी हा करार महत्त्वाचा मानला जात आहे.
तणावानंतर नव्या अध्यायाची सुरुवात
२०२३ मध्ये तत्कालीन कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी एका शीख वेगळावादी कार्यकर्त्याच्या हत्येत भारतीय सहभागाचा आरोप केला होता. भारताने हे आरोप ‘असमंजस आणि निराधार’ ठरवले होते. या प्रकरणामुळे दोन्ही देशांत राजनैतिक तणाव निर्माण झाला, राजनैतिक अधिकार्यांची हकालपट्टी झाली आणि व्यापार चर्चा स्थगित करण्यात आल्या.कार्नी यांचा चार दिवसांचा भारत दौरा संबंधांमध्ये ‘रीसेट’ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. भारत—कॅनडा आर्थिक सहकार्याचा हा नवा अध्याय दोन्ही देशांसाठी दीर्घकालीन धोरणात्मक आणि व्यापारी दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
