नथू ला खिंडीच्या मार्गाने होत असलेली कैलास मानसरोवर यात्रा चीनच्या आडमुठय़ा धोरणामुळे अखेर भारताने रद्द केली आहे.

भारत व चीन यांचे सैन्य सीमेवर आमनेसामने आले होते, त्यानंतरच्या घटनाक्रमात चीनने त्यांच्या रस्ताबांधणीला विरोध करीत असल्याबाबत आक्षेप घेतला होता व भारताने काही बाबीत सुधारणा केल्या नाहीत तर नथु ला मार्गे कैलास मानसरोवर यात्रा होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. भगवान शंकराचे पवित्र स्थान असलेल्या कैलास मानसरोवराला आता भेट देता येणार नसल्याने किमान ४०० भाविक नाराज झाले आहेत. नथु ला खिंडीतून ते तेथे जाणार होते. सिक्किममधील नथु ला मार्गे यात्रा  होणार नसली, तरी उत्तराखंडातील लिपुलेख खिंडीतून मात्र ही यात्रा सुरूच राहणार आहे. प्रत्येकी पन्नास भाविकांच्या आठ तुकडय़ा याप्रमाणे चारशे भाविक नथु ला मार्गे कैलास मानसरोवर यात्रा करणार होते.

कैलास मानसरोवर हे तिबेटमधील ठिकाण आहे. २० जून रोजी नथु ला मार्गे भाविकांची पहिली तुकडी कैलास मानसरोवरला जाणे अपेक्षित होते तर ३१ जुलैला शेवटची तुकडी जाणार होती. या यात्रेला २१ दिवस लागतात. चीनने पहिल्या दोन तुकडय़ांतील भाविकांना व्हिसा दिला होता पण इतर यात्रेकरूंना तो नाकारण्यात आला आहे.