पाकिस्तानसोबत परराष्ट्र मंत्री स्तरावर होणारी चर्चा भारताकडून रद्द करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आल्याने भारताने पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास नकार दिला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये ही बैठक होणार होती. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेणार होत्या. मात्र आता ही भेट रद्द करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

जम्मू काश्मीरच्या शोपियानमधून तीन एसपीओसहित चार पोलीस बेपत्ता झाले होते. दहशतवाद्यांनी या सगळ्यांचं अपहरण केलं होतं. त्यापैकी एका पोलिसाला त्यांनी सोडलं असून इतर तिघांची हत्या केली आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरमधील पोलिसांना नोकरी सोडण्याची धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आली आहे. शुक्रवारीच शोपियांमध्ये चार पोलिसांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर एका पोलिसाला दहशतवाद्यांनी सोडून दिले. मात्र इतर तिघांना त्यांनी ठार केले.

न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेणार होत्या. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली म्हणून पाकिस्तान संबंधीच्या आमच्या धोरणात लगेच कोणताही बदल होणार नाही किंवा द्विपक्षीय चर्चाही सुरु होणार नाही असे असे भारताने स्पष्ट केले होते. मात्र या भेटीमुळे केंद्र सरकारला टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांती चर्चा डिसेंबर २०१५ मध्ये सुरु झाली होती. मात्र पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ही चर्चा स्थगित करण्यात आली. आता इम्रान खान यांनी ही चर्चा पुन्हा सुरु व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी दहशतवाद, काश्मीर प्रश्न आणि एकमेकांशी संबंधित असलेले इतर मुद्दे चर्चेने सोडवले पाहिजेत अशी विनंती इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या पत्रात केल्याचे समजते आहे.