scorecardresearch

“आता केंद्र सरकारची ‘दातखीळ’…”, गलवान-तवांगमधील चिनी घुसखोरीवरून शिवसेनेचा हल्लाबोल

अरुणाचल प्रदेशातील तवांग सीमेवर ९ डिसेंबर रोजी चिनी सैनिकांनी भारताच्या सीमा भागात घुसण्याचा प्रयत्न केला आहे.

“आता केंद्र सरकारची ‘दातखीळ’…”, गलवान-तवांगमधील चिनी घुसखोरीवरून शिवसेनेचा हल्लाबोल

अरुणाचल प्रदेशातील तवांग सीमेवर ९ डिसेंबर रोजी चिनी सैनिकांनी भारताच्या सीमा भागात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे भारत आणि चीन पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. दोन्ही देशाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही देशाचे सैन्य मागे हटले आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. आधीच्या सरकारकडे बोट दाखवून तुम्ही पळ काढू नका, तुमची जबाबदारी तुम्हालाच स्वीकारावी लागेल, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

मोदी सरकार चीनविरोधात ‘जशास तसे’ धोरण राबवत आहे, चिनी सीमेवर हे सरकार तोडीस तोड संरक्षणसिद्धता करत असून येथील सीमाभागात पायाभूत सुविधांचे जाळे २०१४ नंतरच घट्ट विणले, असे दाखवायचे दात केंद्र सरकारची भक्त मंडळी येताजाता चमकवीत असते. मात्र, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ९ डिसेंबर रोजी रात्री जे काही घडले, त्यामुळे दाखवायच्या दातांची ‘दातखीळ’ बसली आहे. पुन्हा एकदा केंद्र सरकारचे सर्व दावे फोल ठरले आहेत, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

अरुणाचल प्रदेशमधील तवांग सीमेवर ९ डिसेंबरच्या रात्री चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय सैनिकांनी तो हाणून पाडला आणि चिनी सैनिकांना परत माघारी जाण्यास भाग पाडलं. पूर्व तवांग सीमेवरील यांगत्से पॉइंटवर ही चकमक झाली. दोन्ही देशाचे सैनिक अशाप्रकारे पुन्हा एकदा आमने-सामने आल्याने सीमेवर तणाव वाढला आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

अग्रलेखात शिवसेनेनं म्हटलं की, “आपल्या जवानांनी गलवानप्रमाणे येथेही चिन्यांना त्यांची जागा दाखवली हे चांगलेच झाले, पण केंद्रातील सरकारचे काय? भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले तर जशास तसे उत्तर दिले जाईल, भारताची एक इंचही जमीन कोणाला गिळू देणार नाही, असे इशाऱ्यांचे ‘अग्निबाण’ सध्याचे सरकार नेहमीच बीजिंगच्या दिशेने सोडत असते. मात्र हे अग्निबाण फुसके आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यांचे नगारेही फुटके आहेत. हे ९ डिसेंबर रोजी पुन्हा सिद्ध झाले. दोन वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यात जसा हल्ला चिन्यांनी भारतीय सैन्यावर केला होता तसाच हल्ला तवांगमध्येही करण्याची चिनी लष्कराची योजना होती. सुदैवाने भारतीय सैन्याने आक्रमक प्रत्युत्तर देत चिन्यांना हुसकावून लावले.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-12-2022 at 08:05 IST

संबंधित बातम्या