पीटीआय, नवी दिल्ली

भारत आणि चीनदरम्यान मंगळवारी व्यापार आणि सीमेवरील शांततेसंबंधी चर्चा झाली, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. व्यापाराबरोबरच दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता कायम राखण्याचे महत्त्व यावरही भर देण्यात आला. दोन्ही देशांदरम्यान परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चेनंतर मिस्री यांनी यासंबंधी माहिती दिली.

विक्रम मिस्री आणि चीनचे परराष्ट्र सचिव मा झाक्सू यांच्या चर्चेमध्ये द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. पूर्व लडाखमध्ये चिनी सैनिकांच्या घुसखोरीनंतर दोन्ही देशांदरम्यान संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. तो निवळण्यासाठी गेल्या वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. मा झाक्सू हे चीनचे कार्यकारी उपपरराष्ट्रमंत्रीही आहेत. ते ब्रिक्स शेर्पा बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत.

भारत व चीनदरम्यान अद्ययावत हवाई वाहतूक सेवा कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप भारत-चीन सामरिक चर्चेदरम्यान सहमती झाली. लडाखमधील तणावानंतर दीर्घकाळ नागरी हवाई वाहतूक बंद होती. ती पुन्हा सुरू झाली असली तरी त्याचा अधिक विस्तार करण्याची गरज आहे. परराष्ट्र सचिवांच्या चर्चेत द्विपक्षीय संबंधांना आलेल्या सकारात्मक गतीचा आढावा घेण्यात आला, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली.