scorecardresearch

लडाखमधील स्थितीवर आता तरी तोडगा निघणार का? भारत आणि चीनमध्ये होणार चर्चेची १५वी फेरी!

भारत आणि चीनमध्ये येत्या ११ मार्च रोजी चर्चेची १५वी फेरी पार पडणार आहे.

india china discussion
भारत आणि चीनमध्ये चर्चेची १५वी फेरी!

भारत आणि चीन यांच्यादरम्यान लडाख सीमेवरील भूभागावरून सुरू असलेल्या तणावावर तोडगा निघावा यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न केले जात आहेत. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये आत्तापर्यंत १४ वेळा चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, अद्याप या मुद्द्यावर तोडगा निघालेला नसून आता यासंदर्भात चर्चेची १५वी फेरी पार पडणार आहे. यांदर्भात भारतीय हद्दीतूल चुशुल-मोल्डो सीमेवर निश्चित ठिकाणी दोन्ही बाजूच्या लष्करातील कमांडर पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. भारताकडून लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता हे भारतीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत.

तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजू प्रयत्नशील

“दोन्ही देशांमधील वादग्रस्त जमिनीबाबत तोडगा काढण्यावरच दोन्ही देश लक्ष केंद्रीत करणार आहेत. नुकतेच दोन्ही देशांकडून परस्परांना मान्य असणारा तोडगा काढण्यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनांमुळे यासंदर्भात सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे”, अशी प्रतिक्रिया लष्करातील सूत्रांकडून मिळाली आहे.

पीपी१५ ठिकाणासंदर्भात निर्णय अपेक्षित

याआधी दोन्ही देशातली कमांडर पातळीवरची चर्चेची १४वी फेरी जानेवारी महिन्यात पार पडली होती. मात्र, त्यातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. मात्र, यावेळी दोन्ही बाजूंनी दिलेल्या संयुक्त निवेदनामध्ये यासंदर्भात पुन्हा चर्चा करण्याबाबत संकेत देण्यात आले होते. आता शेवटच्या फेरीमध्ये पेट्रोलिंग पॉईंट १५ संदर्भात सकारात्मक तोडगा निघण्याची आशा भारताला वाटत आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी गोर्गा पोस्टजवळील पीपी१७ए या ठिकाणाहून सैन्य माघारी घेण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता.

भारत-चीन सीमेवर तणाव कायम असताना चीनच्या अर्थसंकल्पात संरक्षण दलासाठी घसघशीत तरतूद, गेल्या वर्षाच्या तुलनेत…

सद्यस्थितीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारताकडच्या बाजूला पीपी१५ या ठिकाणी एका प्लाटूनएवढं चीनी सैन्य आहे. देपसांग पठारावरील पीपी१०, पीपी११, पीपी११ए, पीपी१२ आणि पीपी१३ या ठिकाणी जाण्यापासून चीनी सैन्य भारतीय सैन्याला रोखत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2022 at 17:01 IST

संबंधित बातम्या