जम्मू-काश्मीरमधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अद्यापही कायम आहे. पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता. त्यानंतर पाकिस्तानने एक निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या एअरपोर्ट अथॉरिटीने भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद केली होती आणि अद्यापही बंदच आहे.

भारताच्या मालकीच्या किंवा भारताद्वारे चालवल्या जाणाऱ्या किंवा लीजवर घेतलेल्या सर्व नागरी, लष्करी विमानांसाठी पाकिस्तानने त्यांची हवाई हद्द बंद केलेली आहे. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांना लांबचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. मात्र, आता यावर पर्याय काढण्यासाठी भारत एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.

भारतीय विमान कंपन्यांसाठी चीनच्या शिनजियांगची हवाई हद्द हा एक पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध करण्याबाबत भारत आणि चीनमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. भारत आणि चीनमध्ये ही चर्चा वर्षभरापासून सुरू आहे. परराष्ट्र मंत्रालय देखील या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे विमान इंधनाचे दर वाढल्याने खर्चही वाढला आहे. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांसाठी हा पर्यायी मार्ग महत्त्वाचा ठरू शकतो. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिलं आहे.

पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून शिनजियांगच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याबाबत भारत चीनशी चर्चा करत आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आले होते. नवी दिल्लीतील ब्रिक्स परिषदेत त्यांनी हजेरी लावली होती. शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या काही दिवसांतच ही हालचाल दिसून आली आहे.

विमान कंपन्यांना लांबचा मार्ग का स्वीकारावा लागतोय?

मध्य पूर्वेतील तणाव आणि पाकिस्तानची हवाई हद्द बंद असल्यामुळे भारतीय विमान कंपन्यांना अरबी समुद्र, मध्य आशिया आणि आफ्रिकेच्या काही भागांवरून जाणाऱ्या लांबच्या मार्गांचा अवलंब करणं भाग पडत आहे. याचा थेट परिणाम हा विमान कंपन्या आणि प्रवाशांवर होत आहे. प्रवासाचा वेळ वाढतो, इंधनाचा वापर अधिक होतो आणि कर्मचारी वर्गाचं (क्रू) कामही वाढतं. पाकिस्तानची हवाई हद्द टाळल्यामुळे लांब पल्ल्याच्या विमान प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या वाढतो.