India Condemns Fujairah Attack 2026: अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. पर्यायी उभय देशातील तणाव वाढतच असल्याचे चित्र आहे. अशात इराणने संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) फुजैराह पेट्रोलियम इंडस्ट्रीज झोनवर हल्ला केला. या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. याबाबत आता भारताचे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. भारतीय नागरिक जखमी झालेली ही घटना अस्वीकार्य असल्याचे भारताने स्पष्ट केले.

भारताकडून हल्ल्याचा निषेध

फुजैराह पेट्रोलियम इंडस्ट्रीज झोनवर केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाल्याची घटनेचा निषेध करणारे निवेदन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर शेअर केले आहे. ​”तीन भारतीय नागरिक जखमी झालेल्या फुजैराहवरील हल्ला पूर्णपणे अस्वीकार्य आहे. आम्ही हे शत्रुत्व आणि नागरी पायाभूत सुविधा तसेच निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणे त्वरित थांबवण्याचे आवाहन करतो,” असे जयस्वाल यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका

मध्य पूर्वेत शांतता आणि स्थैर्य निर्माण होण्यासाठी भारत नेहमीच चर्चेतून मार्ग काढण्यासाठी प्राधान्य देईल, अशी भूमिकाही परराष्ट्र मंत्रालयाने या निवेदनाद्वारे स्पष्ट केली आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित वाहतूक पूर्ववत व्हावी अशी मागणीही भारताने केली आहे. शांततेतून मार्ग काढण्यासाठी भारत सर्व आवश्यक सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचेही भारताने स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींकडून निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तीव्र शब्दात या हल्ल्यात भारतीय नागरिक जखमी झालेल्या घटनेचा निषेध केला. “नागरिकांना लक्ष्य करणे आणि पायाभूत सुविधांवर हल्ला करणे अस्वीकार्य आहे. भारत युएईबरोबर खंबीरपणे उभा असून, शांततेतून मार्ग काढण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यास तयार आहे. होर्मुझमधून सुरक्षित आणि विनाअडथळा वाहतूक होणे प्रदेशातील शांतता, स्थैर्य आणि जागतिक उर्जा सुरक्षेसाठी महत्वाचे आहे”, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

इराणकडून खंडन

संयुक्त अरब अमिराती देशाकडून या हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली आहे. हवाई सुरक्षा प्रणालीमध्ये १५ क्षेपणास्त्र डागल्याचे दिसून आले. इराणकडून चार ड्रोन सोडण्यात आले होते. यापैकी एक ड्रोन फुजैराह पेट्रोलियम इंडस्ट्रीज झोनवर आदळला यामुळे सर्वात मोठ्या तेल प्रक्रिया प्रकल्पात आग लागली, यात याठिकाणी काम करणारे तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. इराणने मात्र, हा हल्ला त्यांच्याकडून करण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले. तेहरानच्या माध्यमांनी देखील हल्ल्याच्या वृत्तांचे खंडन केल्याचे समोर आले आहे.