सिंगापूरमध्ये असलेल्या १३ भारतीय नागरिकांना झिका रोगाची लागण झाली असल्याचे भारताच्या पराराष्ट्र मंत्रालयाने गुरूवारी सांगितले. एडिस एजिप्ती डासामुळे होणा-या या रोगाने बाझिल आणि इतर दक्षिण अमेरिकी देशांत थैमान घातला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने या देशांत याआधीच धोक्याचा इशारा दिला होता. झिकाचा विळखा हा फक्त ब्राझीलपूरता मर्यादित होता. पण आता सिंगापूरमध्येही या रोगाने थैमान घातले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सिंगापूरमधल्या १३ भारतीयांना या रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या असून झिकाचा विषाणू त्यांच्या शरीरात असल्याचे समोर आले आहे. तर येथे कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या २१ चीनी नागरिकांना देखील झिकाची लागण झाल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. पण यांच्यावर योग्य उपाय केले तर लवकरच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल अशी माहिती देखील पराराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. झिकाचे लागण झालेले सगळेच बाधित हे एका बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी काम करत असल्याची माहिती ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिली. गेल्याच आठवड्यात सिंगापूरमध्ये झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यामुळे इतर नागरिकांना याची लागण होऊ नये यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना केल्या जात आहेत. तर दुसरीकडे मलेशियामध्ये देखील झिकाचा पहिला रुग्ण आढळला आहे.