नवी दिल्ली : भारत हा अति-प्रक्रिया केलेल्या पदार्थांसाठी (जंक फूड) जगातील सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ बनत आहे. या पदार्थांमधील अतिचरबी, मीठ आणि साखरेचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, अशा पदार्थांच्या जाहिरातींवर सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे.
पारंपरिक माध्यमांसह डिजिटल माध्यमांवरही सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत अशा पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा पर्याय तपासला जाऊ शकतो. ब्रिटन, चिली आणि नॉर्वे यांसारख्या देशांच्या धर्तीवर हे पाऊल उचलण्याचे सुचवले आहे. ब्रिटनने अलीकडेच रात्री ९ पूर्वी जंक फूडच्या जाहिरातींवर बंदी घातली आहे.
सध्याच्या जाहिरात नियमावलीत ‘दिशाभूल करणाऱ्या’ जाहिरातींची स्पष्ट व्याख्या नसल्याने कंपन्या त्यांच्या उत्पादनांचा आरोग्यदायी किंवा एनर्जी देणारे, असा खोटा दावा करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. केवळ ग्राहकांच्या वर्तनात बदल करून आहार सुधारता येणार नाही, तर यासाठी उत्पादनावर नियंत्रण आणि शाश्वत आहाराला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांची गरज असल्याचे अहवालातून अधोरेखित करण्यात आले आहे.

