Mamdani Note for Umar Khalid: दिल्लीतील २०२० दंगलीप्रकरणी आरोपी म्हणून तुरुंगात असलेल्या उमर खालिदसाठी न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी हस्तलिखित पत्र लिहिले होते. या पत्रावर आता भारताने टीका केली आहे. लोकप्रतिनिधींनी इतर लोकशाही देशांमधील न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे, असे प्रत्युत्तर भारताच्या वतीने शुक्रवारी देण्यात आले.
शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी त्यांना जोहरान ममदानी यांच्या पत्राबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी लोकप्रतिनिधी असलेल्यांनी इतर लोकशाही देशातील न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे, असे विधान केले. तसेच त्यांनी (ममदानी) त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यावर लक्ष केंद्रित करावे, असेही जयस्वाल म्हणाले.
डिसेबंर महिन्यात उमर खालिदच्या पालकांनी न्यूयॉर्कमध्ये जोहरान ममदानी यांची भेट घेतल्यानंतर ममदानी यांनी उमर खालिदसाठी एक हस्तलिखित पत्र दिले होते. या पत्रात ममदानी यांनी खालिदला पाठिंबा देणारे मत व्यक्त केले होते.
या पत्रात ममदानी यांनी म्हटले होते, “प्रिय उमर, कटुतेबद्दलची तुझी मते आणि त्याचे महत्त्व सांगणारे तुझे शब्द मला अनेकदा आठवतात. तुझ्या आई-वडिलांना भेटून आनंद झाला. आम्ही सर्व जण तुझ्याबद्दलच विचार करीत असतो.” ममदानींच्या हस्तलिखित पत्रातून त्यांची उमर खालिदबद्दल असलेली सहानुभूती दिसून आली होती. पत्राखाली ममदानी यांनी स्वाक्षरीही केली होती.
उमर खालिदची मैत्रिण बनोज्योत्स्ना लाहिरी यांनी हे पत्र त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केले होते. त्यानंतर भारतात यावरून विविध प्रतिक्रिया उमटल्या.
सार्वजनिक पदावर असलेल्यांनी वैयक्तिक पूर्वग्रह व्यक्त करणे शोभत नाही. अशा टिप्पण्यांऐवजी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित करणे चांगले होईल, असे रणधीर जयस्वाल म्हणाले.
उमर खालिदचे वडिलांनी काय सांगितले?
उमर खालिदचे वडील सय्यद कासिम रसूल इलियास यांनी टाइम्स ऑफ इंडियाला या पत्राबाबत माहिती दिली होती. डिसेंबर २०२५ मध्ये मुलीला भेटण्यासाठी मी अमेरिकेला गेलो होतो. त्यावेळी जोहरान ममदानी यांच्याशी माझी भेट झाली. यादरम्यान तुरुंगात असलेल्या खालिदबाबत आमच्यात तासभर चर्चा झाली. ममदानी यांनी या खटल्याकडे आपले पूर्ण लक्ष असल्याचे मला सांगितले होते. त्यावेळी खालिदने तुरुंगातून आम्हाला लिहिलेली पत्रेही मी त्यांना वाचायला दिली होती. ही पत्रे वाचल्यानंतरच ममदानी यांनी खालिदला पत्र लिहिले होते, असे कासिम यांनी स्पष्ट केले.
