गेल्या काही दिवसांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये नागरिक महागाईच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. वाढलेल्या महागाई विरोधात सरकारविरुद्ध तेथील नागरिकांचा मोठा संताप पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांकडून आंदोलन करण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांचं हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी पाकिस्तान सरकार आणि लष्कराकडून प्रयत्न केले जात आहेत.
या आंदोलनात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील सांगितली जाते. तसेच पाकिस्तानच्या लष्कराकडून थेट नागरिकांवर गोळीबार करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी देखील आंदोलकांवर टीका केली आहे. दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घडत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकी वृत्तपत्राने एक वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्या वृत्तात पाकव्याप्त काश्मीरबाबत करण्यात आलेल्या उल्लेखावरून भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात ‘पाकिस्तानव्याप्त काश्मीर’चा उल्लेख ‘पाकिस्तानी काश्मीर’ असा केला आहे. त्यामुळे यावरून अमेरिकेतील भारतीय दूतावासाने ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकी वृत्तपत्रावर जोरदार टीका करत सुनावलं आहे. तसेच ‘पाकिस्तानी काश्मीर अशी कोणतीही गोष्ट नसून फक्त पाकिस्तानव्याप्त काश्मीर आहे’, असं म्हणत ‘द न्यूयॉर्क टाइम्स’चं हे वृत्त दिशाभूल करणारं असल्याचं भारताने म्हटलं आहे.
भारताने काय म्हटलं?
“‘द न्यूयॉर्क टाइम्स’कडून दिशाभूल करणारे आणि चुकीचे शीर्षक असलेलं एक वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. मात्र, ‘पाकिस्तानी काश्मीर’ अशी कोणतीही गोष्ट नाही, तर केवळ पाकिस्तानव्याप्त काश्मीर आहे”, अशा शब्दांत अमेरिकेतील भारतीय दूतावासाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील हिंसाचाराबाबत ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालावरून टीका केली आहे. तसेच या वृत्तपत्राने अहवालात केलेल्या वर्णनावरून भारताने तीव्र आक्षेप नोंदवलत सुनावलं आहे.
