देशातील करोनाबाधितांची सख्या सातत्याने कमी होत आहे. यासोबत आणखी एक चांगली बातमी आहे. भारताने करोनाविरोधातील लढाईत मोठी कामगिरी करत लसीकरणात ९९ कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला आहे. भारतात तब्बल ९९ कोटी लोकांना करोनाची लस देण्यात आली आहे. देशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना लसीकरणातील ही विक्रमी कामगिरी दिलासादायक आहे. देशात ९९ कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून दिली आहे.

“आपण ९९ कोटींवर आहोत आणि १०० कोटी लसीकरणाचा मैलाचा दगड गाठण्यासाठी भारताची विक्रमी वाटचाल सुरू आहे,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात ८७,४१,१६० जणांचं लसीकरण करण्यात आलं. दुसरीकडे देशातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. देशात गेल्या २४ तासांत केवळ १३ हजार ५८ नवे रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या केल्या २३१ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तसेच १९ हजार ४७० रुग्णांनी दिवसभरात करोनावर मात केली असून १६४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या नवीन रुग्णसंख्येसह देशातील एकूण बाधितांची संख्या ३ कोटी ४० लाख ९४ हजार ३७३ झाली असून आतापर्यंत ३ कोटी ३४ लाख ५८ हजार ८०१ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत ४ लाख ५२ हजार ४५४ लोकांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे.