मुंबई : भारताचा पारंपरिक डेअरी उद्योग गेल्या दहा वर्षांत मोठ्या परिवर्तनातून गेला असून स्टार्टअप्सच्या वाढत्या सहभागामुळे या क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. तंत्रज्ञानाचा वापर, थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणारे (डी२सी) मॉडेल आणि बदलत्या ग्राहक पसंतीमुळे डेअरी व्यवसाय अधिक संघटित, पारदर्शक आणि स्पर्धात्मक होत आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार २०१४-१५ मध्ये १४६.३ दशलक्ष टन असलेले देशातील दूध उत्पादन २०२३-२४ मध्ये २३९.३ दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. म्हणजेच गेल्या दशकात सुमारे ६३ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. वार्षिक सरासरी वाढ दर (सीएजीआर) सुमारे ५.५ ते ६ टक्के राहिला आहे. या वाढीमुळे भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहे. याच काळात डेअरी क्षेत्रात स्टार्टअप्सचा उदय हा महत्त्वाचा ट्रेंड ठरला आहे. उद्योग तज्ञांच्या मते सध्या भारतात अंदाजे १५० दरम्यान डेअरी-केंद्रित स्टार्टअप्स सक्रिय आहेत. ही संख्या आयटी क्षेत्राच्या तुलनेत कमी असली तरी वाढीचा वेग अत्यंत जास्त आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत अनेक स्टार्टअप्सनी गुंतवणूक उभारून विस्तार साधला आहे.स्टार्टअप्सच्या वाढीमागे ग्राहकांच्या बदलत्या गरजांचा मोठा वाटा आहे. सेंद्रिय दूध, ए २ दूध, तसेच चीज, दही, प्रोटीनयुक्त उत्पादने यांसारख्या मूल्यवर्धित उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. शहरी भागात आरोग्याविषयी वाढती जागरूकता आणि दर्जेदार उत्पादनांची मागणी यामुळे या नव्या कंपन्यांना मोठी संधी मिळाली आहे.
तंत्रज्ञानाचा वापर हा या बदलाचा केंद्रबिंदू ठरला आहे. आयओटी, डेटा अॅनालिटिक्स, मोबाइल अॅप्स आणि डिजिटल पेमेंट्स यांचा वापर करून स्टार्टअप्सने दूध संकलन, गुणवत्ता नियंत्रण आणि वितरण प्रक्रिया अधिक कार्यक्षम केली आहे. डी२सी मॉडेलमुळे कंपन्या थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत असून, मध्यस्थांची गरज कमी झाली आहे. याचा फायदा ग्राहकांसोबतच शेतकऱ्यांनाही होत आहे.भारताचा डेअरी उद्योग आर्थिकदृष्ट्या देखील वेगाने वाढत आहे. २०२५ पर्यंत या क्षेत्राचा बाजारमूल्य अंदाजे २१ लाख कोटींवर पोहोचला असून २०३० नंतर हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये स्टार्टअप्सचा वाटा सातत्याने वाढत आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठीही हा बदल महत्त्वाचा ठरत आहे. देशातील सुमारे ७ कोटी शेतकरी डेअरी व्यवसायाशी जोडलेले असून स्टार्टअप्समुळे त्यांना थेट बाजारपेठ मिळत आहे. त्यामुळे उत्पादकांना अधिक चांगले दर मिळण्याची शक्यता वाढली आहे.तथापि या क्षेत्रासमोर काही गंभीर आव्हाने अजूनही कायम आहेत. कोल्ड-चेन पायाभूत सुविधांची कमतरता, ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा अभाव आणि मोठ्या प्रमाणावर असंघटित बाजारपेठ हे अडथळे ठरत आहेत. उद्योगातील ६० टक्क्यांहून अधिक हिस्सा अजूनही असंघटित असल्याचे मानले जाते.एकंदरीत गेल्या दशकात डेअरी स्टार्टअप्सनी भारतीय दुग्ध उद्योगाला आधुनिक आणि स्पर्धात्मक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उत्पादनात झालेली ६३ टक्के वाढ, वाढते बाजारमूल्य आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेता, पुढील काही वर्षांत या स्टार्टअप्सचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
